नाशिकमध्ये देशातील आदर्श उपकेंद्र उभारणार – उदय सामंत

म्हसरूळ (नाशिक) : देशात आदर्श ठरेल असे उपकेंद्र नाशिकमध्ये उभारले जाणार आहे, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या जागेच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी ‘सकाळ’शी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. 

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची ग्वाही 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक येथील उपकेंद्र दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील ६३ एकर जागेवर हे उपकेंद्र होणार आहे. शासनाने २०१४ मध्ये जमीन हस्तांतरित केली होती. त्यातील एकूण चाळीस एकर जमीन संपादित झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार (ता. २२) शिवनई येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या वेळी उपकेंद्राच्या कामात येणाऱ्या अडचणींबाबत विद्यापीठाचे कुलगुरू व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कामाचा आढावा घेतला. तसेच, शिवनईचे सरपंच, पोलिसपाटील व ग्रामस्थ यांच्यासमवेत चर्चा देखील केली. 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा

या जागेवर पुणे विद्यापीठाचे भव्य उपकेंद्र

यानंतर ‘सकाळ’शी संवाद साधताना ते म्हणाले, की या जागेवर पुणे विद्यापीठाचे भव्य उपकेंद्र साकारले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाच्या सेवा येथे पुरविल्या जातील. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आदर्श ठरेल, असे हे उपकेंद्र असेल. आपण उभारलेल्या या उपकेंद्राचा आदर्श घेऊन इतर राज्य त्याचे अनुकरण करतील, असे त्याचे स्वरूप व बांधणी असेल. कामाचा प्रारंभ म्हणून लवकरच संपादित केलेल्या या जागेवर चेनलिंग फेसिंग केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली. यामुळे या उपकेंद्राच्या उभारणीकडे राज्याचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष असणार आहे.  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना