नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता

नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील विविध ठिकाणांहून सहा अल्पवयीन बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामध्ये दोन मुले व चार मुलींचा समावेश असून, पाच पोलिस ठाण्यांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरांमधून 18 वर्षांच्या आतील मुले, मुली बेपत्ता होण्याचे तसेच पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबक नाका परिसरातील रमाबाई आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी तिला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोडले होते. महाविद्यालय सुटल्यानंतरही मुलगी घरी परतली नसल्याने अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. गंजमाळ परिसरातील श्रमिकनगरातून एक मुलगी बेपत्ता आहे. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यावरून भद्रकाली पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवननगरच्या स्वामी समर्थ केंद्र परिसरातील घरातून तरुणीला आमिष दाखवून अज्ञाताने पळवून नेल्याच्या तक्रारी कुटुुंबाने दिल्या आहेत.

द्वारकाजवळील ट्रॅक्टर हाउस परिसरात एका सेवाभावी संस्थेचे खुले निवारागृहातून 12 वर्षीय मुलगा बेपत्ता झाला. बालकल्याण समितीच्या मोहिमेत संबंधित मुलगा आढळला होता. आईवडिलांच्या ताब्यात देण्यापूर्वीच या मुलाने निवारागृहातून धूम ठोकली, तर सहावी स्कीम परिसरातून तरुणाला पळवून नेल्याची तक्रार त्याच्या पालकांनी पोलिसांत नोंदविली आहे. दरम्यान, शरणपूर रोडवरील कस्तुरबानगरातील तरुणीला युवकाने सटाणा येथे पळवून नेल्याचा दावा संबंधित कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी संशयित गौरव पुंजाराम अहिरे (25, रा. सटाणा) याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता appeared first on पुढारी.