नाशिकमध्ये परवानगीवरून शिवप्रेमी आक्रमक, आता रात्री 12 पर्यंत…

शिवजयंती www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देखावे, डीजे व अन्य परवानगीसाठी अडवणूक केली जात आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. महाराजांच्या जयंती सोहळ्याला यंत्रणांकडून होणाऱ्या दुजाभावाबाबत शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला. शिवप्रेमींची आक्रमक भूमिका बघता पालकमंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देताना रविवारी (दि. १९) रात्री १२ पर्यंत वाद्यांना परवानगी असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये शुक्रवारी (दि. १७) पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिवजन्मोत्सव सोहळ्याची बैठक पार पडली. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, सहसचिव राजू लवटे यांच्यासह शिवजन्मोत्सव आयोजन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे भगवंत पाठक यांनी शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्याला पोलिसांनी परवानगी दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. मामा राजवाडे यांनी ड्रोन उड्डाणासाठी परवानगीची मागणी केली. कैलास देशमुख यांनी हिंदू सण-उत्सवांना पोलिस प्रशासन व यंत्रणांकडून अडवणूक केली जात असल्याची टीका केली. संदीप लभडे यांनी शिवजयंती व महाशिवरात्रीचा उत्सव विचारात घेता, पंचवटीतील वाहतूक वळविण्याची सूचना केली. योगेश गांगुर्डे यांनी महापालिका परवानगीसाठी अव्वाच्यासव्वा शुल्क आकारत असल्याची तक्रार केली. यावेळी उपस्थितांनी एक खिडकी योजनेची एकमुख मागणी पालकमंत्र्यांकडे केली.

पालकमंत्री भुसे यांनी, बैठकीत मांडलेले मुद्दे सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविताना पिण्याच्या पाण्याची व अखंडित विद्युतपुरवठा करावा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला केल्या. पालखी सोहळ्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी पाठविला आहे. न्यायालयाच्या नियमानुसार मंडळांनी वाद्य वाजविताना उत्साहपूर्ण वातावरणात सोहळा साजरा करण्याचे आवाहन ना. भुसे यांनी केले.

‘त्या’ देखाव्यांना परवानगी नाहीच

शिवजयंतीला काही मंडळांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली व अफझलखान वधाचा देखावा उभारण्याची तयारी केली. पण, पोलिसांनी त्याला परवानगी नाकारल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली. त्यावर ना. भुसे यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कोणीच पुसू शकत नाही. महाराजांनी त्यांच्या जीवनात हजारो विधायक कामे केली आहेत. महाराजांचे हजारो गुण देखाव्यांतून सादर करता येतील, अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांचे कान टाेचले.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये परवानगीवरून शिवप्रेमी आक्रमक, आता रात्री 12 पर्यंत... appeared first on पुढारी.