Site icon

नाशिकमध्ये बनावट रासायनिक औषधे व खतविक्रेत्यांचा सुळसुळाट

नाशिक,  दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी बनावट रासायनिक औषधे व खतविक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून, गत वर्षी अनेक शेतकर्‍यांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी लागणारे निर्यात प्रमाणपत्र मिळाले नसल्याने पश्चात्तापाची वेळ आली होती. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा पडला होता. यावेळी कृषी विभागाने बनावट औषधे, खते विक्री करणार्‍यांना रोखण्यासाठी व्यावसायिकांवर बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी मागणी दिंडोरी, पेठ तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक कृषी विभागाने तळेगाव दिंडोरी व ओझर येथे केलेल्या कारवाईत सिजेंटा कंपनीच्या नावाने बनावट रिडोमिल व स्कोर, बीएएसएफ कंपनीच्या नावाने बनावट अ‍ॅक्रोबॅट, तर कोर्टेवा कंपनीच्या नावाचा वापर करून विक्री केल्या जाणाऱ्या बनावट करझेट औषधांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दिंडोरी व ओझर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हैदराबादी मटेरिअल्स या कंपनीच्या नावाने शेतकऱ्यांना या बनावट औषधांची विक्री केली जात होती. संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही याची गंभीर दखल घेत बनावट कीटकनाशके (हैदराबादी मटेरिअल्स) वापरण्यापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावध केले आणि मूळ कीटकनाशके खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. बनावट पावडर आणि कंपन्यांच्या ब्रँड नावाचा वापर करीत हैदराबादी मटेरिअलच्या नावाने द्रवपुरवठा केला जात असून, त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

बाजारात सिजेंटा कंपनीच्या नावाने बनावट औषधे विकली जात आहे. शेतकऱ्यांनी दुकानदारांकडून खात्री करूनच रासायनिक औषधांची खरेदी करावी.

-संगदीप खिराडे, सिजेंटा प्रा. लि. सीनियर असोसिएट

शेतकऱ्यांनी परवानाधारक दुकानातूनच रासायनिक औषधांची व खतांची खरेदी करावी व त्याचे पक्के बिल घ्यावे. बाहेरील विक्री करणाऱ्यांकडून औषधांची खरेदी करू नये, ते प्रामाणिक नसतात.

-विजय पाटील, कृषी अधिकारी, दिंडोरी तालुका

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये बनावट रासायनिक औषधे व खतविक्रेत्यांचा सुळसुळाट appeared first on पुढारी.

Exit mobile version