नाशिकमध्ये बनावट रेमडेसिव्‍हिरचा काळाबाजार! रुग्‍णाच्‍या नातेवाईकांचा खळबळजनक आरोप

नाशिक : कोरोना रुग्‍णांच्‍या उपचारासाठी रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनचा तुटवडा भासू लागला आहे. रुग्‍णाचे नातेवाईक चारही दिशांना फिरुन इंजेक्‍शन मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्‍न करत आहेत. मात्र या परीस्‍थितीचा गैरफायदा घेतला जात असल्‍याने चिंता व्‍यक्‍त होते आहे. चक्‍क बनावट रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन विक्री करत काळाबाजार सुरु असल्‍याचा आरोप रुग्‍णाच्‍या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्‍या सहआयुक्‍त माधुरी पवार यांना फोन व मॅसेजद्वारे संपर्क केला असता त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही.

रुग्‍णाच्‍या नातेवाईकांनी केलेल्‍या आरोपानुसार, त्‍यांनी देसाई नामक व्‍यक्‍तीकडून इंजेक्‍शन खरेदी केले. साडे तीन हजार रुपये प्रति इंजेक्‍शन या दराने खरेदी केलेले सर्व इंजेक्‍शन्‍स नकली होते. त्‍यावर फेविक्‍विकने चिटकवलेले होते. दरम्‍यान संबंधिताला विचारणा केल्‍यानंतर पैसे परत मिळाले असल्‍याचा खुलासा संबंधित रुग्‍णाच्‍या नातेवाईकांनी केला आहे. परंतु त्‍या बदल्यात संबंधिताकडून इंजेक्‍शन परत देण्याची मागणी झाल्‍याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. 

चौकशी होणे महत्त्वाचे

परीस्‍थितीचा गैरफायदा घेत अशा पद्धतीने फसवणूक होणे गंभीर आहे. त्‍यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे आवश्‍यक झाले आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्‍या सहआयुक्‍त माधुरी पवार यांच्‍याशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. या घटनेबाबत जिल्‍हा प्रशासन व अन्न व औषध प्रशासन विभाग काय भुमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल. रुग्‍णाच्‍या नातेवाईकांच्‍या दाव्‍याची सत्‍यता व या संपूर्ण प्रकाराविषयीची माहिती चौकशी अंती समोर येऊ शकेल.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

यासंदर्भातील छायाचित्रे व व्‍हिडीओ उपलब्‍ध असून, बनावट रेमडेसिव्‍हिरची विक्रीचा गंभीर प्रकार नाशिकमध्ये सुरु आहे. बनावट इंजेक्‍शन विक्री करणार्यांचा शोध घेत कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
-ॲड. अजिंक्‍य गिते, सामाजिक कार्यकर्ते 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश