नाशिकमध्ये बाजारपेठेते भेसळयुक्त पदार्थ विक्रीचे रॅकेट सक्रिय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत घरोघरी दिवाळी सण आनंदाने साजरा केला जातो. या काळात घरोघरी मनसोक्त खरेदीबरोबरच गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. मात्र, या काळात भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रीचे जणू काही रॅकेटच बाजारपेठेत फिरत असल्याने, आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. होय, सध्या बाजारपेठेत खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्यात मोठी भेसळ केली जात असून, हा ग्राहकांच्या जिवाशीच खेळ खेळण्याचा प्रकार सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे.

ऐन दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर शहरात जागोजागी टाकलेल्या धाडसत्रात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळले होते. विशेषत: पनीरमध्ये भेसळ केली जात असल्याचा भांडा प्रशासनाकडून फोडण्यात आला होता. दिवाळीत मिठाईसह, रवा, मैदा, खाद्यतेल, दूध व दुधाचे पदार्थ, पीठ, साखर, तूप, कडधान्य आदी साहित्यांत भेसळ केली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सणासुदीच्या काळात अन्न प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवायांमध्ये सर्वांत जास्त भेसळ खाद्यतेल, रवा, मैदा, कडधान्य अशा किराणा मालाच्या दुकानात मिळणार्‍या वस्तूंमध्ये आढळत असल्याने, 20 ऑक्टोबरपर्यंत दुकानांना अचानक भेटी देऊन, नमुन्यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच मावा, खवा, मिठाई विक्रेते तसेच होलसेल विक्रेत्यांकडून नमुने घेतले जात आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही भेसळीचे प्रकार सर्रास घडतात. मात्र, प्रशासनाकडून कारवाईचे साधे सोपस्कारही पार पाडले जात नसल्याने भेसळ करणार्‍यांना जणू काही अभयच मिळत आहे. दरम्यान, दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता, यंदाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. अशात प्रशासनाकडून धाडी टाकण्याचे प्रमाण वाढले असून, पदार्थांबरोबरच स्वयंपाकघराची स्वच्छता, कामगारांना स्वच्छ कपडे आदींवरही विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान, नागरिकांनीही भेसळयुक्त पदार्थांबाबत अधिक सतर्क राहून आपली फसवणूक टाळावी, तसेच अन्न-औषध प्रशासनास याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सडलेल्या, कुजलेल्या पदार्थांची मिसळण
भेसळयुक्त पदार्थ तयार करताना त्यामध्ये सडलेले, कुजलेले, खराब किंवा किडलेले पदार्थ मिसळले जातात. तसेच उपयुक्त घटक काढून घेतले जातात. मूळ पदार्थांऐवजी बनावट पदार्थ वापरून अन्नपदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ तयार करताना मर्यादेपेक्षा जास्त अयोग्य रंग वापरले जातात. शिवाय साठवण कालावधी वाढविण्यासाठी रासायनिक अंशही मिसळतात.

तर राज्यांतून मावा, खवा
दिवाळी काळात गोडधोड तयार करण्यासाठी खवा, मावा यांचा सर्वाधिक वापर केला जातो. नेमक्या याच पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असून, हे भेसळयुक्त पदार्थ इतर राज्यांतून आणले जात असल्याचेही यापूर्वी समोर आले आहे. त्यामुळे यंदाही इतर राज्यांतून, विशेषत: गुजरातमधून भेसळयुक्त मावा आणि खवा नाशिकमध्ये आणण्यात येईल, असा संशय प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये बाजारपेठेते भेसळयुक्त पदार्थ विक्रीचे रॅकेट सक्रिय appeared first on पुढारी.