नाशिकमध्ये बाजारात जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे! पोलिसांचा निर्णय, पाहा VIDEO

नाशिक : आजवर बाजारात खरेदीसाठी पैसे लागतात हे माहिती होते मात्र नाशिकरांना आता बाजारात प्रवेश करण्यासाठी देखील पैसे मोजावे लागणार आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना पोलिसांनी कारवायाची धार तीव्र केली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आता बाजारात प्रवेशासाठी देखील पावती फाडावी लागणार आहे..

रविवारी रात्रीपासून पोलिसांनी नाकाबंदी, मास्क न घालता फिरणाऱ्यासह उघड्यावरील विक्री अशा विविध पातळ्यावर कारवाया सुरु केल्या आहेत. रविवारी रात्री शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या सुमारे ३६३ जणांवर कारवाया केल्या. तर, आज जागोजागी बंदोबस्त लावतानाच महापालिकेच्या भाजीमार्केटात गर्दी टाळण्यासाठी एकच प्रवेशद्वारातून गर्दी नियंत्रणाचे उपाययोजना सुरु केल्या. 

 

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशानुसार, अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील बाजारपेठ भागात गर्दी कमी करण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यात आज सोमवारी (ता.२९) सकाळी अकराला उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते महापालिकेचे विभागीय अधिकारी मयूर पाटील, नितीन नेर, मोदल वाडकर, जितेंद्र पाटोळे पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, किशोर मोरे सातपूर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर आदीची बैठक झाली. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

भाजीमार्केट होणार लॉक 

अंबडला पवन नगर मार्केट, सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अशोक नगर मार्केट, इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील काला नगर मार्केट हे चारही बाजूने सील करण्यात येणार आहे. या मार्केटमध्ये सर्वांसाठी एकाच ठिकाणी एन्ट्री पॉईंट ठेवला जाईल. प्रत्येक  व्यक्तीला मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी पावती घ्यावी लागेल. प्रत्येकाला बाजारात प्रवेशासाठी पाच रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. बाजारपेठेतील विक्रेते यांच्यासाठी देखील पास देण्यात येणार आहेत. या ,सर्व उपाययोजनांच्या मदतीने बाजारात गर्दी कमी करण्यासाठी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शहरात रामकुंड परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून दोन दिवस या भागातील वीरांच्या मिरवणूका तसेच रंगपंचमीचे रहाड सुरु करायला यंदा प्रतिबंध आहे. 

विना मास्क कारवाया 

पोलिस ठाण्यानुसार कारवाया आडगाव (३९), म्हसरुळ (३६), पंचवटी (०७), भद्रकाली (५५), मुंबई नाका ((५७), सरकारवाडा (४६), गंगापूर (४५), सातपूर (०५), अंबड (४१), इंदिरानगर (१६), नाशिक रोड 
(०६), दे.कॅम्प (१०) याप्रमाणे शहर पोलिसांनी एकुण ३६३ जणांना दंड केला. 

हेही वाचा > कोरोनात मधुमेहींसाठी 'म्युकोरमायकोसिस' रोग ठरतोय 'यमराज'!...

 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील बाजारातील गर्दी नियंत्रणासाठी एकच प्रवेशद्वार सुरु ठेवले जाणार आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी नागरिकांकडून पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 
- विजय खरात (पोलिस उपायुक्त विभाग दोन)