नाशिकमध्ये बारा दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा; मोहीम प्रभावित होण्याची शक्‍यता 

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लसीकरण मोहिमेवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. जिल्‍हास्‍तरावर रोज सरासरी दहा हजार नागरिकांना लसीकरण केले जात आहे. लसीकरणाचा वेग वाढत असली तरी येत्‍या दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच साठा जिल्‍हास्‍तरावर उपलब्‍ध असल्‍याचे समजते.

बारा दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा 

कोव्‍हॅक्‍सिन लशीचा तुटवडा जाणवत असून, कोव्‍हिशिल्‍डवर संपूर्ण भिस्‍त अवलंबून आहे. दरम्‍यान जिल्ह्यात आत्तापर्यंत कोव्‍हॅक्‍सिनचे केवळ ४५ हजार ३४० डोस उपलब्‍ध झाले असून, तुलनेत कोव्‍हिशिल्‍डचे ४ लाख ४७ हजार २२० डोस उपलब्‍ध झालेले आहेत. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

कोव्‍हॅक्‍सिनचा तुटवडा 
राष्ट्रीय स्‍तरावर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्‍या ठिकाणांमध्ये नाशिकचा समावेश असल्‍याने जिल्‍हा प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी सर्वोत्‍परी उपाययोजना केल्‍या जात आहेत. मात्र, रुग्‍णसंख्या वाढीची गती अशीच कायम राहिली तर आरोग्‍य व्‍यवस्‍था कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या लॉकडाउन लागू केलेला असताना या कालावधीत अधिकाधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्राधान्‍य दिले जात आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

जिल्ह्यात कोव्हिशिल्‍डचे ४ लाख ४७ डोस
जिल्हाभरात १२६ केंद्रावर सध्या लसीकरण सुरू आहे. असे असले तरी पुढील साधारणतः बारा दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा सध्या उपलब्‍ध असून, यामुळे मोहीम प्रभावित होण्याची शक्‍यता आहे. कोव्‍हिशिल्‍डच्‍या तुलनेत कोव्हॅक्सिन लशीची उपलब्‍धता कमी असल्‍याने या लसीचा तुटवडा जाणवतो आहे. केंद्राकडून आत्तापर्यंत नाशिकला कोव्हिशिल्डचे ४४ लाख ७ हजार २२० डोस उपलब्ध झालेले आहेत. देशभरात कोव्‍हॅक्‍सिनचा तुटवडा असून, जिल्ह्यात गेल्‍या तीन महिन्‍यात या लशीचे अवघे ४५ हजार ३४० डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरणाची मोहीम वेग धरत असताना, जिल्ह्यासाठी चाळीस लाख डोस उपलब्‍ध करून देण्याची मागणी जिल्‍हा प्रशासनाने केंद्राकडे नोंदविली आहे. दरम्‍यान, मंगळवारी (ता. ६) नाशिक विभागाकरिता कोव्‍हॅक्‍सिनचे ३३ हजार २८० डोस उपलब्‍ध झाले आहेत. यापैकी नाशिक जिल्ह्याकरिता ६ हजार ७२० डोस उपलब्‍ध असणार आहेत.