नाशिकमध्ये बॅरेकेडिंग अन्‌ पोलिस छावणी; प्रवेश शुल्काच्या अघोरी उपायाने नागरिकांत नाराजी 

नाशिक : प्रतिव्यक्ती पाच रुपये प्रवेश शुल्क देऊन बाजारात केवळ एकच तास खरेदी करता येणार आहे. या निर्णयानंतर पोलिस आणि महापालिकेने मिळून शहरातील मुख्य बाजारपेठांसह विविध उपनगरांमधील बाजार सोमवारी (ता. २९) बॅरेकेडिंगने बंदिस्त केले आहेत. दुपारनंतर मेन रोड, शिवाजी रोड येथील मुख्य बाजारात जाणारे महत्त्वाचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेडिंग करत बंद केले.

बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला पाच रुपयांची पावती महापालिका कर्मचाऱ्यांकडून दिली जात होती. पोलिस आणि महापालिका प्रशासनाचा गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खरेदीसाठी वेळमर्यादा अन‌् प्रवेश शुल्क वसुलीची अघोरी निर्णय नागरिकांच्या किती पचनी पडतो, हा प्रश्नच आहे. 

 महापालिका कर्मचाऱ्यांसोबत पोलिस तैनात

शहरात शिवाजी रोड, मेन रोड, गाडगे महाराज पुतळा ते सरस्वती चौकापर्यंत (बादशाही कॉर्नर) खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी असते. या गर्दीवर आता नियंत्रण ठेवण्यासाठी या बाजारपेठेकडे येणारे प्रमुख रस्ते पोलिसांनी सोमवारी बॅरिकेड टाकून बंद केले. बादशाही कॉर्नर, नवापुरा गल्ली, धुमाळ पाइँट, सेंट थॉमस चर्च कॉर्नर, वावरे गल्ली या ठिकाणांहून नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रत्येक पॉइंटवर महापालिका कर्मचाऱ्यांसोबत पोलिस कर्मचारीही दोन सत्रांत बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून, राज्य पोलिस कायदा कलम ४३ नुसार गर्दीवर नियंत्रणासाठी हा उपाय शहरात राबविला जात असल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे प्रयोग बाजारपेठांमध्ये राबविण्याची ही राज्यातील बहुदा 
पहिलीच वेळ असल्याने तो नागरिकांच्या किती पचनी पडतो, हा विषय आहे. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

विक्रेते, कर्मचाऱ्यांना पास 

बाजारपेठांमधील विक्रेते व त्यांच्याकडील कामगारांना प्रवेशासाठी भद्रकाली, अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलिस ठाण्यांतर्फे विहित नमुन्यातील पास दिले जाणार आहेत, तर त्या भागात राहणाऱ्या रहिवाशांना पत्त्याचा पुरावा दाखवून (आधार कार्ड) दाखवून प्रवेश दिला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 
 
हेही वाचा - भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण