नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिकचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या गिरीश महाजन यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपद बहाल करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांना मात्र या समिती च्या सहअध्यक्षपदावर समाधान मानावे लागले असून, नाशिकमधील राष्ट्रवादीचे हेवीवेट मंत्री छगन भुजबळ यांना शिखर समितीवर पाठवत फडणवीस यांनी महाजनांचा नाशिकमधील मार्ग सुकर केला आहे. (Nashik Kumbh Mela 2026-27)
सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असताना महापालिका वगळता शासन, जिल्हा प्रशासन पातळीवर कोणत्याही हालचाली दिसत नसल्याचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनात उमटले होते. आमदार सीमा हिरे तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अधिवेशनादरम्यान प्रश्न उपस्थित केल्यानंतर अखेर शासनाला सिंहस्थ समन्वय समितीच्या गठणाची जाग आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती सोबतच ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १४ जणांची जिल्हास्तरीय कार्य समिती असणार आहे. भुजबळांचा समावेश शिखर समितीत करण्यात आला आहे. (Nashik Kumbh Mela 2026-27)
राज्यामध्ये जून २०२२ मध्ये शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे महाजन यांच्याकडे येतील, असे चित्र होते. पुढे त्यांना १५ ऑगस्टच्या ध्वजवंदनाचा मानदेखील दिला होता. मात्र, दुय्यम खाते मिळाल्यामुळे नाराज असलेल्या भुसे यांना पालकमंत्रिपद दिले गेले. नंतर भुसे यांना रस्ते विकास महामंडळातर्फे मोठे खाते दिल्यानंतर महाजन यांना नाशिकचे पालकमंत्रिपद दिले जाईल, अशी अटकळ होती. मात्र पुढे तेही झाले नाही. अखेरीस महाजन यांना एक प्रकारे जिल्हा समितीचे अध्यक्ष करून कुंभमेळा मंत्रीच बनवले गेल्यामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :
- Shri Ram Mandir Ayodhya : श्रीराममंदिर लोकार्पणाचे नाशिककरांना आमंत्रण, अयोध्यातून अक्षता कलश दाखल
- सरकारी कर्मचार्यांचा संप मागे
- ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण द्या : विजय वडेट्टीवार
The post नाशिकमध्ये भरणार कुंभमेळा, कुणाकडे जबाबदारी? appeared first on पुढारी.