नाशिकमध्ये भाजप पक्षात कुरबुरी; फुटीर नगरसेवकांवर वॉच, प्रभारींकडे तक्रारी 

नाशिक : महापालिका निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक असून, त्या अनुषंगाने सर्वच नगरसेवकांना महत्त्वाच्या पदावर काम करण्याची आस लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक भाजपचे प्रभारी जयकुमार रावल यांच्याकडे महापौर, शहराध्यक्षांसह गटनेत्यांच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. मात्र, तक्रारकर्त्यांमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवकांचा समावेश आहे. यामुळे सानप पक्षात खऱ्या अर्थाने सक्रिय झाल्याचे बोलले जात असून, तक्रारींच्या माध्यमातून महत्त्वाच्या पदांबरोबरच शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याची रणनीती आखली जात आहे. 

प्रमुखपद हवे असल्याने तक्रारींचा ससेमीरा

भाजपच्या अनेक नगरसेवकांचा ओढा महाविकास आघाडीकडे असल्याने या पार्श्‍वभूमीवर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पदभार काढून माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपविला आहे. श्री. रावल यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप कार्यालयात नगरसेवकांची स्वतंत्रपणे बैठक घेतली. तीत माजी आमदार सानप समर्थक नगरसेवकांनी महापौरांसह शहराध्यक्ष, गटनेत्यांबाबत तक्रारींचा पाढा वाचला. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद विकोपाला पोचल्याचे दिसून आले. सानप समर्थक नगरसेवकांना महत्त्वाच्या पदांबरोबरच स्थायी समितीवरही अधिक प्रतिनिधित्व हवे आहे. याचबरोबर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहराध्यक्ष हे प्रमुखपद हवे असल्याने तक्रारींचा सिसेमीरा लावल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

स्थायी समितीची सत्ता जाण्याची भीती

एकीकडे तक्रारींचा पाढा वाचत असताना, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याची कबुली देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थायी समितीत भाजपचा एक सदस्य कमी होऊन शिवसेनेचा वाढणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप व विरोधकांचे आठ-आठ असे समसमान सदस्य बळ राहणार आहे. यामुळे शेवटच्या वर्षात भाजपच्या हातून स्थायी समितीची सत्ता जाण्याची भीती निर्माण झाल्याने त्यादृष्टीने श्री. रावल यांनी चर्चा केली. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

फुटीर नगरसेवकांवर वॉच 
६४ नगरसेवकांशी स्वतंत्र चर्चा करताना श्री. रावल यांनी चार वर्षांतील कामांचा आढावा घेतला. प्रभागात कोणती कामे केली, उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली कामे, कुठल्या पदांवर काम केले आदींबाबत रावल यांनी चर्चा केली. ज्या नगरसेवकांना कुठलीच पदे मिळाली नाहीत, त्यांचा विचार करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. विषय समित्यांसह स्थायी समितीवर संधी मिळालेल्या नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली. पक्ष सोडून जणाऱ्या नगरसेवकांची यादी तयार करण्यात आल्याचे समजते. त्यांच्यावर वॉच ठेवला जाणार असून, त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न होणार असल्याचे समजते. 

मुंबईत आज बैठक 
निर्माण झालेल्या पक्षांतर्गत पेचाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रभारी जयकुमार रावल यांच्यासोबत शहरातील तिन्ही आमदार, महापौर व कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. ९) बैठक होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांकडे शहराध्यक्षपदावर आक्रमक चेहरा असल्याने भाजप शहराध्यक्षपदावर आक्रमक चेहऱ्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी नगरसेवकांमधून शहराध्यक्षपदावर नियुक्ती करण्याची मागणी केल्याने त्यासंदर्भातही चर्चा होणार असल्याचे समजते.