नाशिकमध्ये मंडळांना मिऴणार ऑनलाइन परवानगी, ‘अशी’ आहे नियमावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये चैतन्य संचारले आहे. राज्य शासनाकडून गणेशोत्सवाबाबत निर्णय घेतला असला तरी मंडळांना मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून, नाशिक महापालिकेने ऑनलाइन परवानगी देण्यासाठी व्यवस्था केली आहे. गणेश मंडळांकडून केल्या जाणार्‍या जाहिरातींवर मनपाकडून कर आकारणी केली जाणार आहे.

कोरोनामुळे 2020 आणि 2021 या दोन वर्षांत सर्वच सण, उत्सवांवर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे मर्यादित स्वरूपात आणि नियमांचे पालन करूनच उत्सव साजरे करावे लागले. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यंदा गणेशाचे आगमन 31 ऑगस्टला घरोघरी होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी साजर्‍या होणार्‍या उत्सवासाठी महापालिकेने यापूर्वी जाहीर केलेली शासनमान्य सुधारित नियमावली अमलात आणण्याचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

मंडळांना मंडप धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. मंडप, आरास, देखावा उभारण्यासाठी महापालिकेसह पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. वाहतुकीला अडथळा आणणार्‍या मंडपाला परवानगी दिली जाणार नाही. त्याचबरोबर रेल्वेस्थानक, बसस्थानक, ऑटो रिक्षा स्टॅण्ड, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी मंडप टाकता येणार नाही. उत्सवासाठी कमान उभारताना निकष ठरवून देण्यात आले असून, मंडळांना आता दोनच कमानी उभारता येणार आहेत.

अशी आहे नियमावली

http://http://nmcfest.nmc.gov.in या वेबसाइटवर अर्ज करण्याची सोय.

मंडपापासून 15 मीटरपर्यंतच विद्युत रोषणाई.

मंडप टाकण्यासाठी रस्ता खोदण्यास मनाई.

रस्ता खोदल्यास दंडात्मक कारवाई.

वाणिज्य स्वरूपाच्या जाहिरातींना कर.

नोंदणीकृत कंत्राटदारांकडून विद्युत विषयक कामे.

आवश्यक कागदपत्रे

मंडपाचा स्थळ दर्शक नकाशा.
पोलिस विभागाचा ना हरकत दाखला.
वाहतूक शाखेचा ना हरकत दाखला.
अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला.

नागरिकांना तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

तक्रार निवारण केंद्र (18002331982)
पूर्व विभाग (0253- 2504233)
पश्चिम विभाग (0253-2570493)
पंचवटी (0253- 2513490)
सिडको (0253- 2392010)
सातपूर (0253-2350367)
नाशिक रोड (0253-2460234)
ई-मेल आयडी- [email protected]

शैक्षणिक संस्था, रुग्णालये, न्यायालय, धार्मिक ठिकाणे अशा क्षेत्रात 100 मीटरपर्यंत मंडप उभारता येणार नाही. लाउडस्पीकरसाठी पोलिस विभागाची स्वतंत्र परवानगी आवश्यक आहे. लेखी परवानगी मिळाल्यानंतरच मंडप टाकता येणार आहे. वीज वितरण कंपनीने परवानगी दिल्यास मंडपाच्या ठिकाणी वीजपुरवठा घेता येईल. मंडपाच्या ठिकाणी 200 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या आणि वाळूच्या दोन बादल्या भरून ठेवाव्या लागणार आहेत. अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मंडळांना घ्यावे लागणार असल्याचे मनपाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये मंडळांना मिऴणार ऑनलाइन परवानगी, 'अशी' आहे नियमावली appeared first on पुढारी.