नाशिकमध्ये मंदिरात दर्शन घ्यायला जाणं महिलेला महागात! नवरात्रोत्सवातही महिला असुरक्षित

नाशिक : शहरातील नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या स्वेता पिसोळकर या गृहिणीची देवीवर नितांत भक्ती असल्याने नवरात्रीचे नऊ दिवस त्या उपवास करणार आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं खुली करण्यात आल्याच्या आनंदात घराजवळील जेलरोड परिसरात असलेल्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अनेक महिन्यांपासून लॉकअपमध्ये ठेवलेल सोन्याचं मंगळसूत्र त्यांनी गळ्यात अडकवलं आणि गुरुवारी संध्याकाळी मोठ्या उत्साहात आपल्या मैत्रिणीसोबत त्या पायी दर्शनासाठी निघाल्या. मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे मनोभावे दर्शन तर घेतले मात्र मंदिराबाहेर पडताच असं काही घडलं की पिसोळकर कुटुंबाची झोपच उडाली.

स्वेता दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडल्या, घरी ओटीचे सामान घेऊन जाण्यासाठी त्यांनी मंदिराबाहेरीलच फुलविक्रेत्याकडून नारळ-फुले खरेदी केली आणि घरी जायला निघताच दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचे 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले आणि पळ काढला. या घटनेनंतर पिसोळकर यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा इथं दाखल झाला, चोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात झाली मात्र 24 तास उलटूनही अद्याप ते हाती लागले नाहीत.

घडलेल्या प्रसंगानंतर स्वेता पिसोळकर या भयभीत झाल्या आहेत. 'माझे पती मला म्हणाले की मी तुला नवे मंगळसूत्र घेऊन देईल तू चिंता करू नकोस पण मला तेच मंगळसूत्र हवे आहे, पोलिसांनी चोरांना शोधावं आणि ते परत मिळवून द्यावं. माझे इतर कुठलेही दागिने गेले असते तर मला एवढं वाईट वाटलं नसतं. मात्र, सौभ्याग्याचं लेणं गेल्याने मला खूप दुःख झाले आहे, रात्रभर मी झोपलेली नाही तसेच महिला या सुरक्षित नसून पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी तातडीने काहीतरी पाऊलं उचलावीत' अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलतांना व्यक्त केलीय.

धक्कादायक बाब म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी नाशिक शहरात फक्त पिसोळकर यांचेच नाही तर संध्याकाळी 6 ते 8 या दोन तासातच अंबड परिसरात ललिता जाधव आणि शरणपूर रोडवर कल्पना येवले या दोन महिलांचे मंगळसूत्र असे सर्व मिळून एकूण 2 लाख 62 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करत चोरटे फरार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाल्याने आणि गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नाशिक पोलिस करतायत तरी काय? असा प्रश्न आता या महिलांकडून उपस्थित केला जात असून याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांनी स्पष्टीकरण देत कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली हे खरं असले तरी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. या घटनांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आम्ही बंदोबस्त वाढवलाय, चोरांचा शोध घेतोय असं म्हंटलय.

शहरात मागील काही महिन्यांपासून फक्त सोनसाखळी चोरीच नाही तर घरफोडी, चोऱ्या, हाणामारी, प्राणघातक हल्ले अशा सर्वच गुन्हेगारी प्रकारामध्ये वाढ होत गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलंय तर दुसरीकडे पोलिस मात्र हेल्मेटसक्ती मोहीम राबवण्यात आणि इतर सामाजिक कार्यक्रमात व्यस्त असल्याचं बघायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातय. सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये सोनसाखळी चोरांची प्रचंड दहशत पसरली असून पोलिसांनी आता या घटनांवर आळा बसवणं आणि चोरांच्या मुसक्या आवळण गरजेचं बनलय.