Site icon

नाशिकमध्ये रविवारी वारकरी स्नेहसंमेलन, पाच हजार वारकरी राहणार उपस्थित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये येत्या रविवारी (दि.८) एकदिवसीय वारकरी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनात प्रवचनकार, कीर्तनकार, दिंडीचालक व मालक यांच्यासह वारकरी सहभागी होणार आहेत. यावेळी वारकऱ्यांचे प्रश्न, समस्या व अडचणींबाबत चर्चा होणार असून, यावेळी ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक पुंडलीक थेटे व स्वागताध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गुरुवारी (दि.५) पत्रकार परिषदेत दिली.

राज्यभरातील वारकऱ्यांना त्यांचे प्रश्न व समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यादृष्टीने नाशिकमध्ये प्रथमच वारकरी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटीमधील श्रीराम वाचनालयाच्या पटांगणात होणाऱ्या या संमेलनाचे उद‌्घाटन सकाळी ८ ला रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. समारोपाला आमदार श्रीकांत भारतीय उपस्थित राहतील, असे थेटे यांनी सांगितले.

संमेलनासाठी राज्यभरातून पाच हजारांच्या आसपास प्रवचनकार, कीर्तनकार, दिंडीचालक-मालक, टाळकरी यांच्यासह वारकरी उपस्थित राहणार आहेत. दोन सत्रांत हाेणाऱ्या संमेलनात वारकरी विविध विषयांवर चर्चा होतील. संमेलनाप्रसंगी विविध प्रकारचे नऊ ठराव मांडण्यात येणार असून, त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे थेटे यांनी स्पष्ट केले. संमेलनाच्या आयोजनात पंचवटीतील संत ज्ञानेश्वर अभ्यासिका, माय-माउली भजनी मंडळ व सीतामाई महिला वारकरी ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले आहे. भविष्यात ही अशा प्रकारचे संमेलन नाशिकमध्ये भरविण्याचा मानस सानप यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेप्रसंगी आयोजक त्र्यंबक गायकवाड, माणिक देशमुख, भरतानंद सांगळे, श्याम पिंपरकर, सुनील फरताळे, प्रवीण आहेर, विश्वास खैरनार, श्याम जोशी, तुकाराम नागरे आदी उपस्थित होते.

संमेलनात मांडणार असे ठराव…

– नाशिक जिल्ह्यात वारकरी महामंडळ स्थापन करावे.

– पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण अशा तीर्थक्षेत्री पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना विमा संरक्षण द्यावे.

– नाशिक जिल्ह्यात वारकरी भवन उभारावे.

– वारकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेले पाच हजार रुपयांचे मानधन त्वरित वितरित करावे.

– वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करावी.

– त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर तसेच जिल्ह्यातून विविध क्षेत्री जाणाऱ्या पालख्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

– आध्यात्मिक व वारकरी संप्रदायातील सर्वांना मोफत वैद्यकीय सोयी सुविधा द्याव्यात.

– वारकऱ्यांना मृदंग, टाळ, हार्मोनियम, वीणा माेफत उपलब्ध करून द्यावा.

– सर्व वारकरी बांधवांना एसटीचा प्रवास मोफत करावा.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये रविवारी वारकरी स्नेहसंमेलन, पाच हजार वारकरी राहणार उपस्थित appeared first on पुढारी.

Exit mobile version