नाशिकमध्ये लसीकरण मोहिमेला ब्रेक! केंद्र बंद करण्याची वेळ; मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच प्रकार समोर

नाशिक : लस घेण्यास केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. साठ वर्षांवरील ज्येष्ठ तसेच ४५ ते ५९ वयोगटातील आजार असलेल्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. महिनाभरापासून लसीकरण मोहीम नियमित सुरू असताना गुरुवारी (ता. १८) अनेक केंद्रांवरून ज्येष्ठ नागरिकांना परतावे लागले. अनेक ठिकाणी वृद्धांना मनस्तापाची वेळ आली

मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच प्रकार समोर

नाशिक रोड येथील बिटको रुग्णालय व जुने नाशिक येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आहे. त्या शिवाय शहरात २७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत. महिनाभरापासून लसीकरण मोहीम नियमित सुरू असताना गुरुवारी अनेक केंद्रांवरून ज्येष्ठ नागरिकांना परतावे लागले. अनेक ठिकाणी वृद्धांना मनस्तापाची वेळ आली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदुरबारला जाण्यासाठी नाशिक येथील ओझर विमानतळावर उतरणार आहेत. त्या वेळी नाशिक शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा ते घेतील. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच लस संपुष्टात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ

कोरोनाला अटकाव करण्यासाठी शहरात सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला गुरुवारी (ता. १८) ब्रेक लागला. कोव्हिशील्ड लसींचा साठा संपुष्टात आल्याने लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ वैद्यकीय विभागावर आली.  शुक्रवारपर्यंत लस प्राप्त होईल, असा दावा वैद्यकीय विभागाकडून करण्यात आला. दरम्यान, पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून कोव्हिशील्ड लस मागविल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी दुपारपर्यंत डोस प्राप्त होतील, असा दावा वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केला. 
 

हेही वाचा  - नाशिकमध्ये कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळला

महापालिकेला प्राप्त झालेल्या लसींचा साठा संपुष्टात आला असून, शासनाकडे दीड लाख लसींची मागणी नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत लस प्राप्त होईल. - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका 

लस संपुष्टात आल्याने लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. केंद्रे बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पालिका प्रशासनाने लसीकरण मोहीम पुन्हा सुरू करावी. 
- डॉ. वर्षा भालेराव, नगरसेविका