नाशिकमध्ये विकेंड लॉकडाउनला प्रतिसाद; बेडसाठी धावाधाव वगळता सगळीकडे शुकशुकाट

नाशिक ः ‘ब्रेक द चेन’ मोहिमेत शहरात दोन दिवस वीकेंड लॉकडाउनचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शनिवार (ता. १०)पासून दोन दिवस विविध भागांत कडकडीत बंद आहे. शनिवारी रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी संतप्त नागरिकांनी केलेल्या आंदोलनाचा अपवाद सोडला, तर शहरात कुठेही गर्दी नव्हती.

अत्यावश्यक सेवा होत्या सुरु. 

वैद्यकीय सेवा, औद्योगिक कारखानदारी, वाहतूक वगळता अगदी खाद्यपदार्थ, किराणा आणि हॉटेलही बंद आहेत. शहरात दोन्ही दिवस सकाळी भाजीपाला विक्री, दूध, वैद्यकीय सोयी-सुविधांची दुकाने एवढ्यापुरता बाजार भरला. त्यानंतर दिवसभर बॅरिकेडिंगमुळे रस्ते दुपारनंतर निर्मनुष्य होते. यामुळे प्रशासनाच्या बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सोमवारी (ता. १२) व्यावसायिक संघटनांच्या आग्रहानुसार अनेक दुकाने सुरू होणार आहेत. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

नागरिकांनी जाणले परिस्थीचे गांभीर्य! 

शहर- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूसंख्याही वाढली आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्याने दुकानदार, व्यावसायिकांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली. नागरिकांनीही घरीच राहणे पसंत केले. मंदिरांनीही कुलूपच होते. किराणा दुकानेही सकाळपासून बंद होती. मोठे भाजीबाजारही बंद होता. दुग्ध व्यावसायिक, मेडिकल स्टोअरच फक्त सुरू होते.

पोलीस कारवाई आणि उन्हाचा तडाखा यामुळे नागरिक बसले घरीच. 

पोलिस व महापालिकेच्या पथकांची गस्त सुरू असल्याने दंड व कारवाईच्या भितीने व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवणेच पसंत केले. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकही घराबाहेर पडले नाहीत. नियम न पाळणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश होते. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून पोलिस विनामास्क फिरणारे, प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यां कारवाई करीत होते. पोलिसांनी या काळात बेशिस्त नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर दंडवसुली झाली आहे.

बेडसाठी धावाधाव वगळता सगळीकडे शुकशुकाट 

वीकेंड लॉकडाउन असला, तरी कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची रेमडेसिव्हिरसाठी गर्दी, रांगा, तसेच बेड मिळत नसल्याने बेडसाठी गर्दी हे चित्र सरकारी रुग्णालयात कायम होते. मात्र, रविवारी त्यात मोठी घट झाली असल्याचे पाहायला मिळाले. रेमडेसिव्हिर थेट रुग्णालयाला उपलब्ध करून दिले. बेडसाठीची धावाधाव मात्र सुरू असल्याने सरकारी रुग्णालयात गर्दी कायम आहे. मात्र, सामान्य नागरिकांनी बाजार, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळून वीकेंड लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा