नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात? कोरोना चाचणीत पहिल्याच दिवशी ३४ शिक्षक पॉझिटिव्ह

नाशिक : शासनाच्‍या निर्देशांनुसार सोमवार (ता. २३)पासून शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना सुरवात होणार आहे. त्यार्श्‍वभूमीवर सुरू केलेल्या चाचण्यात पहिल्या दिवशी ३४ शिक्षक पॉझिटिव्ह सापडले. दरम्यान, शुक्रवारी (ता. २०) दिवसभर शहर जिल्ह्यात कोरोना चाचण्यासाठी शिक्षकांच्या रांगा होत्या. 

दिवसभर ३४ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह 
शाळा सुरू होण्यापूर्वी, विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यापूर्वी शिक्षकांना कोरोनाची चाचणी बंधनकारक केलेली असल्‍याने शुक्रवारी दिवसभर चाचणीसाठी शिक्षकांनी तपासणी केंद्रावर गर्दी केली. नाशिकला शहरात समाजकल्‍याण कार्यालय, मेरी परिसर आणि नाशिक रोड भागातील बिटको रुग्‍णालय अशा तीन ठिकाणी शहरातील शिक्षकांसाठी कोरोना चाचणीची सुविधा केली आहे. इयत्ता नववीपुढील वर्ग सुरू करण्यासंदर्भात शासनाने दिशानिर्देश जारी केले आहेत. त्‍यातील महत्त्वाचा भाग म्‍हणजे अध्ययन करणाऱ्या शिक्षकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावयाची आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

नाशिक - चाचणीसाठी शिक्षकांच्या रांगा 
शाळा सुरू व्‍हायला अवघे दोनच दिवस उरलेले असताना, शहर परिसरातील शिक्षकांमध्ये कोरोना चाचणी करून घेण्याविषयी लगबग सुरू होती. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍तरावरून चाचण्या करून घेतल्‍या जात आहेत. तर शहरी भागात नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्‍याण विभाग कार्यालयात चाचणी केली जात होती. शुक्रवारी सकाळी साडेनऊपासून सात तंत्रज्ञांसह पथक स्‍वॅब नमुने घेण्यासाठी उपस्‍थित होते. मात्र शिक्षकांची वाढती गर्दी टाळण्यासाठी पंचवटीतील मेरी परिसरात आणि नाशिक रोड भागात बिटको रुग्‍णालय आवारात चाचणीची सुविधा उपलब्‍ध करून दिली होती. मेरी केंद्रावर २९० तपासण्या झाल्या तर नाशिक रोडच्या बिटको हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये सुमारे अडीचशे शिक्षक-शिक्षकेतरांच्या चाचण्या करण्यात आल्या. रुग्णालय प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. रत्नाकर पगारे, प्रमोद कसोटिया, पवन भरसाट व अन्य आरोग्य कर्मचारी स्वॅब नमुने घेत आहेत. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान
३४ शिक्षक पॉझिटिव्‍ह 
दरम्‍यान, गुरुवारी (ता. १९) दिवसभरात ३९१ शिक्षकांचे स्‍वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी ३४ शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍याचे सूत्रांनी सांगितले आहे. शुक्रवारीदेखील चारशेहून अधिक शिक्षकांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. 

मेरी केंद्रावर दुपारपर्यत २९० शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले. गर्दी होईल याचा अंदाज होता .त्यामुळे आधीपासून नियोजन केले होते. परिणामी कमी वेळात एवढ्या मोठ्या संख्येने चाचण्या करता येणे शक्य झाले. -मंगेश चव्हाण (पर्यवेक्षक मेरी कोवीड सेंटर)