नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस लाखोंचा गंडा

fraud

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये संशयित भामट्यांनी डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये संबंधितांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

डॉ. गौरव अशोकराव गिते (33, रा. एम. एच. बी. कॉलनी, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित कमलेश टिकमदास तेजवाणी (रा. इंदिरानगर) यांनी मार्च 2021 मध्ये आर्थिक गंडा घातला. डॉ. गिते यांना रुग्णालय बांधण्यासाठी संशयित कमलेश तेजवानी यांनी स्वत:च्या व्यंकटेश असोसिएट्स फायनान्स कंपनीतून एक कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी विविध शुल्क आकारणी करून तेजवानी यांनी डॉ. गितेंकडून 17 लाख 20 हजार रुपये घेतले. मात्र, पैसे दिल्यानंतरही तेजवानी यांनी कर्ज मंजूर केले नाही. त्यामुळे डॉ. गिते यांनी इंदिरानगर पोलिसांकडे तेजवानी विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

दुसर्‍या घटनेत सहा जणांनी मिळून संजीव लक्ष्मीकांत चौधरी (34, रा. पवई) यांची फसवणूक करीत प्लॉटचा परस्पर व्यवहार केला. चौधरी यांच्या फिर्यादीनुसार संशयित राधिका अनिल पाटील (34,रा. कळवा पश्चिम ठाणे), अनिल पाटील, अजय वि. कासकर, अ‍ॅड. स्वाती भास्कर पाटील, अ‍ॅड. मुंजल जोशी व एका अनोळखी व्यक्तींने संगनमत करून मार्च 2022 मध्ये हा गंडा घातला. संशयितांनी चौधरी यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, ओळखपत्र आदी कागदपत्रे तयार करून चौधरी यांचा प्लॉटचा एकमकेकांमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवहार केला. त्याचप्रमाणे सातबारा उतार्‍यावरही फेरफार नोंदी करून चौधरी यांची फसवणूक केली.

तर तिसर्‍या घटनेत पंचवटीतील ढिकलेनगर परिसरात राहणार्‍या महिलेस संशयित यशवर्धन सुरेश देशमुख-पाटील याने नोव्हेंबर 2021 ते जुलै 2022 या कालावधीत गंडा घातला. महिलेने शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर नावनोंदणी केलेली असताना संशयित यशवर्धन याने महिलेसोबत ओळख करून लग्नाचे व सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार यशवर्धन याने महिलेकडून सोने घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने एक लाख सहाशे रुपये घेतले. मात्र, त्याने महिलेस दागिने दिले नाही.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरसह जागामालक आणि महिलेस लाखोंचा गंडा appeared first on पुढारी.