नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठी महापालिकेला प्रस्ताव; यंदा पदव्युत्तर सुरू होणार 

नाशिक : ‘एज्युकेशन हब’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्था सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. ८) विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करताना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला स्थान दिले. या महाविद्यालयासाठी ३५ एकर जागेचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला. 

राज्याच्या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. ७) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार महाविद्यालय व संस्था सुरू करण्यासाठी आवश्‍यक बाबींचा पाठपुरावा करण्यात आला. राज्य सरकारने नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्था सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याने भुजबळ मुंबईत उपचार घेत आहेत. अशाही परिस्थितीत महाविद्यालय व संस्था सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबी मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नेमक्या कोणत्या आवश्‍यक बाबी आहेत, याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यातूनच यंदाच्या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होईल, अशी स्थिती तयार झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विविध कामांवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे वैद्यकीय परिषदेला महाविद्यालय आणि संस्था सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची विनंती राज्य सरकारतर्फे केली जाणार आहे. परिषदेतर्फे तपासणी झाल्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ६४ डॉक्टरांची प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

जिल्हा रुग्णालयात पूर्वतयारी 

नाशिकमधील जिल्हा सरकारी रुग्णालयात ७०० खाटा उपलब्ध आहेत. वैद्यकीय परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हा रुग्णालयात पूर्वतयारी सुरू आहे. याशिवाय नवीन जागेत महाविद्यालय आणि संस्था होईपर्यंत आरोग्य विद्यापीठात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग केला जाणार आहे. विद्यापीठाच्या अतिथिगृहाचा वसतिगृह म्हणून, ग्रंथालय आणि निवासस्थानात अधिष्ठांताचे निवासस्थान असा उपयोग करता येईल काय, यादृष्टीने आढावा घेण्यात आला आहे. महापालिकेतर्फे जागेच्या प्रस्तावाला मान्यता मिळताच, महाविद्यालय आणि संस्थेसाठी इमारत उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे. त्यातून एक ते दीड वर्षात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेसाठी स्वतःची इमारत उभी राहू शकेल. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

एमबीबीएससाठी पुढील वर्षी प्रवेश शक्य 

सरकारी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्था यंदाच्या वर्षीपासून सुरू करण्याचे प्रयत्न एकीकडे असताना पुढील शैक्षणिक वर्षात एमबीबीएससाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. एमबीबीएससाठी १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.