
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने शिंदे गटाने जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती केल्या आहेत. त्यानुसार नाशिक ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखदी अनिल ढिकले, तर दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखपदी भाऊलाल तांबडे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोघांनाही नियुक्तिपत्र देण्यात आले असून, जनसामान्यांची कामे मार्गी लावा, पक्षाची शाखा गावागावांत उघडा, अशा सूचनावजा आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच येत्या काळात निश्चितच गाव तिथे पक्षाची शाखा दिसेल, अशी ग्वाही खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली.
गेल्या महिन्याभरात खासदार गोडसे यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच जिल्हाभरातील विविध पक्षांचे पदाधिकारी अजूनही शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षात सहभागी होण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आलेल्या अनिल ढिकले यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातील देवळाली, इगतपुरी आणि सिन्नर या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे, तर भाऊलाल तांबडे यांच्याकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सुरगाणा, कळवण, दिंडोरी-पेठ आणि निफाड या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असेल. तांबडे आणि ढिकले या दोघांनाही मुंबई येथील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अनिल ढिकले यांनी सेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी काम केलेले असून, ते नाशिक पंचायत समितीचे माजी सभापती आहेत, तर भाऊलाल तांबडे यांचा शाखाप्रमुख ते दिंडोरी जिल्हाप्रमुख असा प्रवास आहे. याबरोबरच नाशिक पूर्व तालुकाप्रमुखपदी सुभाष शिंदे यांची, तर नाशिक ग्रामीण पश्चिम तालुकाप्रमुखपदी विलासराजे सांडखोरे यांची नियुक्ती केली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांच्या पक्षाचे सचिव संजय मोरे, मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, संजय बच्छाव, योगेश म्हस्के, लक्ष्मीबाई ताठे, शिवाजी भोर, मामा ठाकरे, सचिन पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
हेही वाचा :
- नानगाव : मळीमिश्रित सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाण्यावर परिणाम
- Google Mistake : गुगलने चुकून एका हॅकरला पाठवले 2 कोटी रुपये, ट्विट व्हायरल…वाचा काय म्हणाले गुगल
- इंदापूर : पतसंस्था सभेत भरणे-पाटील समर्थक शिक्षक भिडले; व्यापारी संकुलाच्या नामांतराने गोंधळ
The post नाशिकमध्ये शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती; ढिकले, तांबडे यांची निवड appeared first on पुढारी.