नाशिकमध्ये शिवसेना महानगरप्रमुखांची ‘भगवी’ घोडदौड! भविष्यात राजकीय ‘कलगीतुरा’ रंगणार

सिडको (नाशिक) : शिवसेना महानगरप्रमुखांची नाशिक शहरात सुरू असलेली ‘भगवी’ घोडदौड सिडकोतच रोखून धरण्यासठी भारतीय जनता पक्षाने ‘शहाणे अस्त्र’ बाहेर काढल्याचे शिवजयंतीनिमित्त दिसून आले. 
आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील शिवसेना नेत्यांनी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावर महानगरप्रमुखाची जबाबदारी सोपविली. काही दिवसांपासून बडगुजर यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शहरात ‘भगवेमय’, तर शिवसैनिकांत ‘जल्लोषा’चे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

बडगुजरांची घोडदौड रोखण्यासाठी भाजपकडून शहाणे अस्त्र 

त्यांचा हा ‘भगवा रथ’ कोठेतरी थांबावा, यासाठी भाजपनेही रणनीती आखली असून, त्यांनी आपल्या ‘भात्या’तील एक बाण नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या रूपात बाहेर काढल्याचे दिसून येत आहे, जेणेकरून सुधाकर बडगुजर यांना सिडकोमध्येच रोखण्याचे नियोजन असल्याचे दिसून येत आहे. याची काहीशी झलक नुकत्याच झालेल्या शिवजयंतीनिमित्त दिसून आली. पहिल्यांदाच सिडकोमध्ये दोन गटांत शिवजयंती साजरी झाली. सुधाकर बडगुजर यांच्या गटाकडून पवन मटाले, तर मुकेश शहाणे यांच्या गटाकडून पवन कातकडे यांचे नाव अध्यक्ष म्हणून घोषित झाले. त्यानंतर पोस्टरवॉरही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गाजले. श्री. शहाणे यांचा पवननगर मैदानावरील देखावा, तर श्री. बडगुजर यांचा उत्तमनगर शाळेच्या मैदानाच्या आवारातील देखावा खरोखर ‘एक से बढकर एक’ असल्याचे शिवप्रेमींना दिसून आले. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

भविष्यात या दोघांत राजकीय ‘कलगीतुरा’ रंगणार
भूमिपूजनप्रसंगी तर दोन्ही गटांमध्ये नाशिक शहरातील सर्वपक्षीय मोठमोठ्या नेत्यांनीही या ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही गटांकडून झालेले जोरदार शक्तिप्रदर्शन यानिमित्त बघायला मिळाले. एवढेच नव्हे, तर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या दोन्ही गटांच्या शिवजयंती देखाव्याप्रसंगी व्यासपीठावर हजेरी लावली. याचे फलित म्हणून की काय मुकेश शहाणे यांना भाजपने दुसऱ्यांदा स्थायी समिती सदस्यपदावर संधी दिली आहे. थोडक्यात काय तर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा झंझावात रोखण्यासाठी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यावर भाजपने अप्रत्यक्षरीत्या जबाबदारी दिल्याचे यावरून दिसून येत आहे. भविष्यात या दोघांत राजकीय ‘कलगीतुरा’ रंगणार यात तिळमात्र शंका नाही.