नाशिकमध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

रामदास कदम पुतळा दहन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या विधानाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मंगळवारी (दि.20) शिवसेनेतर्फे आंदोलन करत शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

दापोली येथे झालेल्या एका कार्यक्रमात कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून, नाशिक शहरातही त्याचे पडसाद उमटले. शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल तसेच जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, मनपाचे माजी गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारत पुतळ्याचे दहन केले. उपनेते बागूल म्हणाले की, शिवसेनेने कदम यांना नेतेपद, आमदारकी दिली. विरोधी पक्षनेते पदासारखे मोठे पद कदम यांना दिले. मात्र, यानंतरही त्यांनी उपकाराची परतफेड बंडखोरीने केली. पक्षाच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करणार्‍या कदम यांना भविष्यात पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.

आंदोलनात शोभा मगर, दीपक दातीर, योगेश बेलदार, सचिन बांडे, अमोल सूर्यवंशी, उमेश चव्हाण, बाळू कोकणे, रवि जाधव, योगेश देशमुख, मसुद जिलानी, राजेंद्र क्षीरसागर, नीलेश साळुंखे, मंगला भास्कर, श्रद्धा कोतवाल, फैमिदा रंगरेज आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.

कदम यांना जिल्हाबंदी करू
मातोश्रीविषयी रामदास कदम यांनी भविष्यात वक्तव्य केल्यास शिवसैनिक त्यांना धडा शिकवतील आणि त्यांना नाशिक जिल्हाबंदी करण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख करंजकर यांनी दिला. शिवसेनाप्रमुखांच्या नावाने राजकारण करणार्‍यांनी ठाकरे कुटुंबीयांवर आक्षेपार्ह विधान करणे संतापजनक असून, कदम यांनी किमान खाल्लेल्या मिठाला तरी जागावे, असा सल्ला महानगरप्रमुख बडगुजर यांनी देत कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.