नाशिकमध्ये शेतकऱ्याने केली कांद्याची होळी; मुख्यमंत्र्यांना लिहिले होते रक्ताने पत्र

नगरसूल www.pudhari.news

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि शासनाची निष्क्रियता याचा निषेध करण्यासाठी मातुलठाण येथील शेतकऱ्याने चक्क कांद्याची होळी करीत होळी साजरी केली. या होळीसाठी मुख्यमंत्री यांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण या शेतकऱ्याने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून दिले होते. मात्र मुख्यमंत्री उपस्थित न राहिल्याने त्याने स्वत:च कांद्याची होळी पेटविली.

येवला तालुक्यातील नगरसूल येथील तरुण शेतकरी कृष्णा भगवान डोंगरे यांनी त्यांच्या सव्वा एकरातील कांद्याला अग्निडाग दिला. यावेळी लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंबा मारून निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यात सध्या शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून कांद्याचे दर कोसळले. कांदा कवडीमोल दराने विक्री करावा लागत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. औषधफवारणी, रासायनिक खते, मजुरी पाहता डोंगरे यांना दीड एकर कांदा पिकविण्यासाठी दीड लाख रुपये खर्च करावा लागला. हा कांदा काढण्यासाठी किमान 30 हजार रुपयांचा खर्च येतो. हा कच \ वसूल होणे सध्याच्या काळात अवघड झाल्याने शेतकरी संतप्त झाल्याचे डोंगरे यांनी म्हटले आहे. कांद्याची होळी करताना उपस्थित महिला शेतकऱ्यांनी सरकारच्या नावाने बोंबा मारत निषेध व्यक्त केला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून येवला शहर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

माझ्या मुलाने शेतात राब-राब राबून उभ्या केलेल्या पिकाला सणाच्या दिवशी पेटवून द्यावे लागले. यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? यावेळी माझे हृदय हेलावले. त्याने हे करताना जिवाचे बरे-वाईट करू नये, असेदेखील वाटत होते. कष्टाने पिकविलेल्या कांद्याला तो पेटवत होता तेव्हा मन हेलावले होते. शासनाने याची नुकसानभरपाई द्यावी, कुणावरही अशी वेळ येऊ नये. – मंदाबाई भगवान डोंगरे (आई).

.कांद्याची होळी www.pudhari.news

नगरसूल : आई मंदाबाई, पत्नी व बहीण सरकारच्या नावाने बोंबा मारत निषेधार्थ संताप व्यक्त करताना. (छाया : भाऊलाल कुडके)

हेही वाचा:

The post नाशिकमध्ये शेतकऱ्याने केली कांद्याची होळी; मुख्यमंत्र्यांना लिहिले होते रक्ताने पत्र appeared first on पुढारी.