नाशिकमध्ये सत्ताकाळात भ्रष्टाचाराचा एकही कलंक नाही : राज ठाकरे

राज ठाकरे

मुंबई : पुढारी वृृत्तसेवा

नाशिक महापालिकेत मनसेला मिळालेल्या सत्तेच्या काळात केलेल्या कामांचे आजही नाशिककर कौतुक करतात. परंतु या पाच वर्षांच्या काळात मनसेवर भ्रष्टाचाराचा एकही कलंक लागलेला नाही. नाशिकमधील हे स्वच्छ नवनिर्माण आम्ही आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रासाठी राबविणार असून, सतरा वर्षे आपण सत्तेपासून दूर असलो तरी नवनिर्माणाची ब्लू प्रिंट तयार असून, लवकरच आपण सत्तेत येऊ, असा आशावाद मनसेचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सैनिकांमध्ये रुजविला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापनदिनी ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मनसेने राज्यासाठी सतरा वर्षांत केलेल्या आंदोलनाचा आढावा घेताना नवीन महाराष्ट्र मनसे निर्माण करणारच, असा आशावाद केला. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी चित्रपट, मराठी युवकांसाठी नोकरभरती यासाठी केलेल्या आंदोलनाचा धावता आढावा घेतला. मोबाइलवर मराठी भाषेत ध्वनिसंदेश, मराठी दुकानांवर मराठीत पाट्या मनसेने केलेल्या आंदोलनामुळेच झळकले, याकडे लक्ष वेधताना त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आपण येत्या २२ तारेखला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होणाऱ्या सायंकाळच्या सभेत भूमिका मांडणार आहे. तेथेच आपण इतर पक्षांच्या भूमिकांची चिरफाड करणार असल्याचा इशाराही खास आपल्या शैलीत दिला.

सत्तेत येण्याची वेळ आता अगदी नजीक आलेली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे सत्तेवर येणारच. आता मार्चची परीक्षा, त्यानंतर ऑक्टोबरची परीक्षा, पुन्हा मार्चची परीक्षा या मानसिक फेऱ्यातून आता पक्षाच्या सैनिकांनी बाहेर पडत आगामी निवडणुकीत राज्यात मनसेचा भगवा फडविण्यासाठी निर्धाराने कामाला लागा आणि सत्ता मिळेल. तुम्ही सत्ता मिळविल्यास नाशिकमध्ये आम्ही ज्या पद्धतीने नवनिर्माण करून दाखविले, त्याप्रमाणेच राज्यातही नवनिर्माण करून दाखवू, असा दावा केला. नाशिकचे नागरिक आजही मनसेने केलेल्या कामाचे कौतुक करतात. आमची सत्ता तेथून गेल्यानंतर नाशिकचे पुढे काय झाले, हे नाशिककरांनी पाहिले आहे. ते आता हळहळतात. ज्या ज्यावेळी नाशिककर मला भेटतात, त्या त्या वेळी मनसेने केलेल्या कामाचे कौतुक करतात. सध्याच्या तेथील कारभाराबाबत संताप व्यक्त करताना मनसेला सत्तेतून दूर केल्याबद्दल हळहळही ते व्यक्त करतात. तेथे सत्तेच्या रूपाने आम्ही कामे केले, परंतु भ्रष्टाचाराचा एकही कलंक आम्हाला लागला नाही, असे सांगताच साऱ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. भाजपला सत्तेत येण्यासाठी १९५२ ते २०१४ इतका प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. परंतु आता मनसेची सत्तेवर येण्याची वेळ आली आहे. तुम्ही कामाला लागा आणि जिंकण्याचा निर्धार करा, असा मंत्र राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कायकर्त्यांना दिला.

…तर महाराष्ट्र खड्ड्यात जाईल

गल्लोगल्ली महाराजांचे, आंबेडकर, फुले यांचे पुतळे उभारून काहीही होणार नाही. या युगपुरुषांनी सांगितलेले विचार जाणून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा. पुतळे उभारून आणि दर पंधरा दिवसांनी जयंत्या साजऱ्या करून काहीही होणार नाही. यामुळे महाराष्ट्र आणखी खड्ड्यात जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये सत्ताकाळात भ्रष्टाचाराचा एकही कलंक नाही : राज ठाकरे appeared first on पुढारी.