नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपला धक्के बसण्यास सुरवात! भाजपच्या आणखी एका नेत्याने घेतली राऊत यांची भेट 

नाशिक :महापालिका निवडणुकीला वर्ष शिल्लक असताना, सत्ताधारी भाजपला धक्के बसण्यास सुरवात झाली आहे. भाजपमध्ये दोन वर्षे बुलंद तोफ म्हणून सभागृहात गाजलेल्या दिनकर पाटील यांनी त्यांच्या स्वभावाला साजेसे शिवसेना खासदार राऊत यांची भेट घेऊन भाजपला धक्का दिला.

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या! पाटील यांची भाजपवर गुगली 

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी शुक्रवारी (ता. ८) शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची खासगीत भेट घेऊन भाजपवर गुगली टाकली. आपली भेट एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या भेटीने भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या. पाटील यांच्याबरोबरच स्थायी समितीचे माजी सभापती रणजित नगरकरही  राऊत यांच्या भेटीला गेले. 

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच

सानप भाजपमध्ये आल्यानंतर पक्षात नाराजी
शुक्रवारी सकाळी पाटील राऊत यांच्या भेटीला पोचले. त्या वेळी मीडियाचा गराडा त्यांना पडला. आपण शाळेच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. पाटील यांच्या शिवसेना नेत्यांच्या भेटीने भाजपमध्ये येत्या काळात आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी नुकताच भाजपमध्ये पुनर्प्रवेश केला आहे. सानप यांचे मोठे विरोधक पक्षात आहेत. सानप आल्यानंतर पक्षात नाराजी पसरल्याने पक्षश्रेष्ठींपर्यंत नाराजी पोचविण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाटील यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याचे समजते. पाटील यांच्यापाठोपाठ भाजपमध्ये नाराज असलेले अनेक नगरसेवक शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.