नाशिकमध्ये सत्ता राखणे भाजपसाठी महत्त्वाचे! सभापतिपदी ‘या’ नावाची चर्चा 

नाशिक : स्थायी समितीचे यंदाचे शेवटचे वर्ष असल्याने सत्ता राखणे भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे समसमान पक्षीय बलाबलात हातची सत्ता जाऊ नये म्हणून भाजपने पुन्हा एकदा गणेश गिते यांनाच सभापतिपदावर विराजमान करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. गिते यांना सभापतिपद मिळाल्यास सलग दोनदा सभापतिपद मिळविणारे तिसरे सभापती ठरणार आहेत. 

सत्ता राखण्यासाठी सभापतिपदाचा उमेदवार देखील सक्षम हवा
महापालिकेत भाजपची बहुमताने सत्ता आहे. परंतु दोन सदस्य कमी झाल्याने तौलनिक संख्याबळ घटले. त्यापूर्वी स्थायी समितीवर भाजपचे नऊ सदस्य होते. सध्याच्या तौलनिक संख्याबळानुसार आठ सदस्य झाले आहेत. स्थायी समितीची सत्ता मिळविण्यासाठी नऊ सदस्यांची आवश्‍यकता आहे. भाजपच्या आठ सदस्य अहमदाबादकडे सहलीसाठी रवाना करण्यात आले आहेत. मनसेच्या एका सदस्याचा भाजपला पाठिंबा मिळणार असल्याने तूर्त स्थायी समितीवर भाजपची सत्ता पुन्हा स्थापन होणार असल्याचे दिसून येत आहे. सत्ता अबाधित राखण्यासाठी सभापतिपदाचा उमेदवार देखील तेवढाच सक्षम असावा, असा सूर पक्षातून व्यक्त करण्यात आल्याने त्याअनुषंगाने विद्यमान सभापती गणेश गिते यांचे नाव सभापतिपदासाठी निश्‍चित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. गिते यांना पक्षश्रेष्ठींकडून देखील ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

...तर गिते ठरणार तिसरे सभापती 
महापालिका स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे उत्तमराव कांबळे १९९२-९३ व १९९३-९४ या कालावधीमध्ये सलग दोनदा सभापती झाले होते. त्यानंतर १९९६-९७ मध्ये विजय बळवंत पाटील सलग दोन वर्षे सभापती राहिले. भाजपकडून गिते सभापती झाल्यास सलग दोन वर्षे सभापती राहणारे तिसरे सभापती ठरतील.