नाशिकमध्ये सरकारी वैद्यकीय अन्‌ पदव्युत्तर पदवी अभ्यास महाविद्यालय; भुजबळांच्या पाठपुराव्याला अखेर यश 

नाशिक : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. १०) झालेल्या बैठकीत नाशिकमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सुरु करण्यात येणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांसाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. 

शंभर विद्यार्थ्यांना मिळेल प्रवेश

भुजबळ यांनी यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठकी घेतल्या होत्या. भुजबळ म्हणाले, की मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांचा विकास व आधुनिकीकरणात जागेअभावी मर्यादा आल्याने त्याला पर्याय म्हणून उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा देऊ शकेल, असे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे उभारणे आता शक्य आहे. नाशिकमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. तसेच, संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय असेल. १५ वैद्यकीय विषयांमध्ये एकूण ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आम्ही राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ‘रोल मॉडेल’ म्हणून विकसित करू. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न रुग्णालयासाठी ६२७ कोटी ६२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

सातत्याने प्रयत्न करत होतो..

नाशिक हा लोकसंख्येच्यादृष्टीने राज्यातील मुंबई-पुणेनंतर तिसरा मोठा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यात ७ आदिवासी तालुके असून, एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. त्यामुळे जनहिताचा विचार करता या वैद्यकीय महाविद्यालयांची गरज भासत होती. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व्हायला हवे, ही नाशिककरांची गेले अनेक दिवसांपासूनची मागणी होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मी सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत होतो, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

२०२२-२३ मध्ये प्रवेश शक्य 

वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे दोन वर्षांनी नाशिकमध्ये सरकारी वैद्यकीय आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. अशातच, आज राज्याच्या मंत्रीमंडळाने दोन्ही महाविद्यालयांना मान्यता दिली असल्याने पूर्वतयारी म्हणून पडताळणी प्रक्रियेला वेग द्यावा लागणार आहे. तसे घडल्यास २०२२-२३ मध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळातच, नाशिक महापालिकेने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची तयारी नाशिक रोडच्या विस्तारित बिटको रुग्णालयात सुरु केली आहे. त्याचवेळी जिल्हा रुग्णालय आणि संदर्भ रुग्णालय अशा दोन्ही व्यवस्था असल्याने सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न तातडीने निकाली निघण्याची शक्यता अधिक आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट