नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोर जाळ्यात

लाचखोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; लाच मागणाऱ्या व घेणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२३ मध्ये ७८६ सापळे रचले. त्यात एक हजार ९८ लाचखोरांना रंगेहाथ पकडले आहे. त्यात सर्वाधिक १६३ सापळे नाशिक परिक्षेत्रात रचून, २७४ लाचखोरांना पकडले आहे, तर एक अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमध्ये सन २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये लाचखोरीच्या गुन्ह्यांमध्ये ३७ गुन्ह्यांची वाढ झाली आहे.

नाशिक परिक्षेत्रात नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात लाचखोरांवर कारवाई केली आहे. त्यात त्यामध्ये भूमी अभिलेख, सहकार विभाग, महसूल व शिक्षण विभागांतील वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांनाही अटक करीत दणका दिला. त्यामुळे तक्रारदारांचा विभागावरील विश्वासही वाढल्याचे चित्र आहे. राज्यात सर्वाधिक कारवाई नाशिक विभागाने केली असून, २०२३ मध्ये लाखो रुपयांची लाच घेतल्याची प्रकरणे नाशिकमध्ये उघड झाल्याने तो राज्यभरात चर्चेचा विषय झाला आहे. नववर्षात लाचखोरीवरील कारवाईचा आलेख चढता ठेवण्याचे आव्हान विभागासमोर आहे. तक्रारदारांच्या तक्रारींनुसार सापळे रचले जात असल्याने तक्रारदारांनीही तक्रारी करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

नाशिक परिक्षेत्र

सापळे – १६०

अपसंपदा – १

अन्य भ्रष्टाचार – २

एकूण गुन्हे – १६३

राज्यातील लाचखोरी…

परिक्षेत्र गुन्हे संशयित
मुंबई 41 56
ठाणे 103 144
पुणे 150 212
नाशिक 163 274
नागपूर 75 116
अमरावती 86 120
छत्रपती संभाजीनगर 125 168
नांदेड 60 80

The post नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोर जाळ्यात appeared first on पुढारी.