Site icon

नाशिकमध्ये सातवर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू : हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांचा गोंधळ

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

बंगल्याजवळ खेळतांना मोठे लोखंडी गेट पायावर पडल्याने पायाला जखम झालेल्या सात वर्षीय बालकाला हिरावाडी रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केलेले असतांना त्याचा सोमवारी (दि. १७) मृत्यू झाला. डॉक्टरांनी केलेल्या उपचारात हलगर्जी व इंजेक्शनचा ओव्हर डोस दिल्याने त्याचा जीव गेला असा आरोप नातेवाईकांनी केल्याची माहिती समोर आली आहे. या मुलाला नंतर पंचवटीतील एका बड्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु, तेथे नातेवाईकांनी गोंधळ घालत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत संबंधित डॉक्टरवर गुन्हा करण्याची मागणी केली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. माञ मध्यरात्रीपर्यंत रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व नातेवाईक देखील ठाण मांडून होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटी परिसरात एका बंगल्याच्या वॉचमनचा आठ वर्षीय मुलगा दोन दिवसांपूर्वी बंगल्यात खेळतांना लोखंडी गेट पायावर पडल्याने त्याला मोठी जखम झाली. त्याला तातडीने हिरावाडी रोडवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तिथे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पंचवटीतीलच एका बड्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असतांना तो मुलगा मयत झाला.

घटनेनंतर बालकाच्या नातेवाईकांनी त्या खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन गोंधळ घालत उपचारात इंजेक्शनचा ओव्हर डोस देत हलगर्जीपणा केल्यानेच मुलाचा जीव गेल्याचा आरोप केला. हॉस्पिटलसमोर नागरिकांचा मोठा जमाव जमल्याने तणावाचे वातावरण पसरले होते. उपचार करणाऱ्या संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणीही केली होती. परंतु काही राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करीत हे प्रकरण मिटविण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे, याप्रकरणी पोलिसांतही रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नव्हती. माञ मध्यरात्रीपर्यंत रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व नातेवाईक देखील ठाण मांडून होते.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये सातवर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू : हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांचा गोंधळ appeared first on पुढारी.

Exit mobile version