नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा नववा बळी गेला आहे. चांदवड तालुक्यातील तिसगावातील ५० वर्षीय व्यक्तीचा नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेताना स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. नाशिक शहरातही स्वाईन फ्लूचा एक नवीन रुग्ण आढळल्याने या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ वर गेली आहे. यामध्ये शहरातील ३१ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २४ रुग्णांचा समावेश आहे.
उन्हाच्या कडाक्यातही स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक ठरला. आता बदलते वातावरण या आजारासाठी पोषक ठरू लागले आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत शहरात स्वाईन फ्लूचे २३ बाधित रुग्ण आढळून आले होते. एप्रिलमध्ये जेलरोड येथील ५९ वर्षीय डॉक्टरचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने या आजाराचे गांभीर्य वाढले. त्यानंतर मे महिन्यात सिन्नरमधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिला, मालेगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती तसेच २९ वर्षीय महिला, निफाड येथील ६८ वर्षीय महिला, कोपरगाव येथील ६५ वर्षीय महिला तसेच नाशिकमधील जेलरोड भागातील ५८ वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पाठोपाठ दिंडोरीतील ४२ वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्याने तिचे निधन झाले. आता चांदवड तालुक्यातील तिसगाव भागातील ५० वर्षीय व्यक्तीचा या आजाराने बळी घेतला आहे. नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते. परंतु, प्रकृती अधिकच खालवल्याने रुग्णाची प्राणज्योत मालावली. त्यामुळे स्वाईन फ्लू बळींचा आकडा आता नऊ झाला आहे.
रुग्णसंख्या ५५ वर
नाशिक शहरात स्वाईन फ्लूचा १ नवा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील स्वाईन फ्लू बाधितांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे. ग्रामीण भागातील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २४ आहे. शहरातील २८ तर ग्रामीण भागातील १७ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरातील २ तर ग्रामीण भागातील ७ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.
शहरात स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. स्वाईन फ्लू ची लक्षणे दिसताच त्वरित लगतच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. लक्षणे असलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
– डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, मनपा.
हेही वाचा –