नाशिकमध्ये होणारा महिंद्राचा ई-व्हेईकल प्रकल्प पुण्यात

e-vehicle project

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी सुमारे १० हजार कोटी गुंतवून इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प उभारत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, आता नाशिकमध्ये होणारा प्रकल्प पुण्यात होणार असल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

भुजबळ यांनी, सभागृहात दाओस येथे जागतिक आर्थिक परिषदेत शासनाने केलेल्या सामंजस्य कराराबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नात त्यांनी म्हटले आहे की, दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत शासनाने जगभरातील विविध कंपन्यांसोबत १.३७ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असल्याचा दावा राज्य शासनाने जानेवारी २०२३ मध्ये केला होता. त्यामध्ये महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रामध्ये 10 हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये होणार असल्याचे राज्य शासनाने अधिकृतरीत्या जाहीर केले हाेते. परंतु, हा विस्तार नाशिकऐवजी अहमदनगर येथे होणार आहे का? या परिषदेत राज्य शासनाने करार केलेल्या अनेक कंपन्या देशात व राज्यात नोंदणीकृत असताना या कंपन्यांसोबत दाओस येथे जाऊन करार करण्यासंदर्भातील कारणे काय आहेत.

त्यावर लेखी उत्तरात ना. उदय सामंत यांनी म्हटले आहे की, दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत शासनाने जगभरातील विविध कंपन्यांसोबत १.३७ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. मात्र, नाशिक येथे महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प होणार नाही. तसेच तो अहमदनगर येथेही स्थलांतरीत करण्यात आलेला नाही, तर महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटोमोबाईल लि. घटक हा सनराइज सेक्टरमधील असून, इलेक्ट्रिक व्हेईकलनिर्मिती हा उच्च तंत्रज्ञानावर आधारित या क्षेत्रातील प्रकल्प आहे. देशांतर्गत इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये 10 हजार कोटींची गुंतवणूक असणारा हा पहिलाचा प्रकल्प असून, हा प्रकल्प पुणे येथे स्थापित होणारा नवीन प्रकल्प आहे, अशी माहिती त्यांनी उत्तरात दिली आहे.

नाशिकच्या पदरी पुन्हा निराशा

दाओस परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये महिंद्राचा नवा प्रकल्प येत असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या घोषणेनंतर नाशिककरांना आनंद झाला नसता, तरच नवल. परंतु, हा आनंद क्षणभंगूर ठरला. कारण हा प्रकल्प नाशिकमध्ये होणार नसून, पुण्यात होणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनीच स्पष्ट केल्याने नाशिककरांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये होणारा महिंद्राचा ई-व्हेईकल प्रकल्प पुण्यात appeared first on पुढारी.