नाशिकमध्ये होणार लॉकडाउन? पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी होणार विचारविनिमय

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, शंभर तपासण्यांमागे  ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन शहरात लॉकडाउन करण्याच्या विचारात असल्याचे समजते.  

नाशिकमध्ये लॉकडाउनचा प्रशासनाचा विचार? 

महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने देखील याला काहीअंशी  सहमती दर्शवली असून, प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस  या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी  विचारविनिमय करून शहरात काही दिवसांसाठी लॉकडाउन  करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. दरम्यान, येत्या शुक्रवारी (ता. २६) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीतही शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची वाढत्या संख्येचा मुद्दा अहवालाच्या माध्यमातून ठेवला जाणार आहे.

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

पालकमंत्र्यांसमवेत बैठकीत मांडणार अहवाल 

वाढत्या रुग्णसंख्येच्या बाबतीत देशातील दहा शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक सातवा आहे. यामुळे प्रशासनानेदेखील कोरोना नियंत्रणासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत, मास्क, सॅनिटायझेशन,  सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असल्या तरी, नागरिकांकडून मात्र तंतोतंत पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.  महापालिकेच्या कोविड सेंटर व रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. सध्या शहरात अंशत:  लॉकडाउन  असला तरी त्याचा फारसा प्रभाव दिसत नाही. लॉकडाउन झाल्यास किमान कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. येत्या शुक्रवारी पालकमंत्री भुजबळ यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यापूर्वी प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना अहवाल सादर करून त्यांच्यामार्फत अंतिम अहवाल या बैठकीत ठेवला जाणार असल्याचे समजते.  

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

शहरात करोना संसर्गाचे व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी का होईना लॉकडाउन  गरजेचे झाले आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. -गणेश गिते, सभापती, स्थायी समिती 

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यामार्फत अहवाल सादर केला जाईल. -कैलास जाधव,  महापालिका आयुक्त