नाशिकमध्ये 22 वर्षांनंतर रंगणार अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

प्रातिनिधीक छायाचित्र,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नववे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २८ व २९ जानेवारी रोजी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांची निवड करण्यात आली आहे.

या संमेलनाला देशभरातून साहित्यिक, विचारवंत येणार असून मुस्लिम : प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा, मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके : साहित्यिक व सामाजिक विश्लेषण, आम्ही भारताचे लोक, सांस्कृतिक दहशतवाद या विषयांवर संमेलनात चर्चासत्रे होणार आहेत. २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. ग्रंथ शोभायात्रेने संमेलनाला सुरुवात होईल. यावेळी पथनाट्य सादर केले जाणार आहे. सकाळी ११ वा. मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन व ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. पहिल्या दिवशी दोन परिसंवाद होणार असून, सायंकाळी फातिमांच्या लेकांचा कविसंमेलन होणार आहे. रात्री बहुभाषिक कविसंमेलन व मिलाजुला मुशायरा होणार आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी तीन परिसंवाद होणार असून, समारोपाला राष्ट्रीय पातळीवरचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाला ४०० ते ५०० मुस्लिम मराठी साहित्यिक महाराष्ट्रभरातून येणार आहेत. प्राचार्य फारुक शेख, अरुण घोडेराव यांनी संमेलनातील उपक्रमांची माहिती दिली.

चौथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २००१ मध्ये कालिदास कलामंदिर येथे झाले होते. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी हे संमेलन नाशिक शहरात होत आहे. 

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये 22 वर्षांनंतर रंगणार अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन appeared first on पुढारी.