नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसला मिळाले 70 लाख पासपोर्ट छपाईचे काम

नोटप्रेस नाशिकरोड,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी)ला 70 लाख ई-पासपोर्ट छपाईचे काम मिळाले आहे. हे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करून द्यायचे असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात ई-पासपोर्टची छपाई नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये (आयएसपी) होईल, यावर शिक्कामोर्तब केले होते. ई-पासपोर्टचे काम मिळण्यासाठी आयएसपी मजदूर संघातर्फे नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाकडे सुरू असलेल्या पत्रव्यवहाराला यश आले. ई-पासपोर्टसाठी मंजूर झालेल्या नवीन ई-पासपोर्ट यंत्रांचे कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती गोडसे आणि जुंद्रे यांनी दिली.

नोटांची छपाई करणार्‍या नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेसमध्ये कोमोरी इंटिग्लिओ, फिनिशिंग व बीपीएस या आधुनिक यंत्रांच्या उभारणीचे काम सुरू आहे. मंजूर झालेल्या दोन इंटिग्लिओ, दोन न्यूमोरोटा, दोन फिनिशिंग, तीन ऑफसेट व दोन बीपीएस या नवीन यंत्रांची उभारणी करण्यात येणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले. दोन्ही प्रेसमध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन नवीन कामांचा दर्जा टिकवून व वेळेत काम करण्यासाठी आयएसपी व सीएनपीमधील कामगार सज्ज असल्याचे गोडसे यांनी सांगितले. भारतात ई-पासपोर्ट प्रथमच तयार होणार आहेत. याशिवाय नेहमीच्या पारंपरिक पासपोर्टचे कामही जोमाने सुरू आहे. भारतात पासपोर्टची छपाई फक्त नाशिकमध्येच होते.

दरम्यान, ई-पासपोर्टचे काम मिळाल्याने दोन्ही प्रेसमध्ये कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी मजदूर संघाचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, जयराम कोठुळे, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, अशोक पेखळे, सहसचिव संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, इरफान शेख, अशोक जाधव, राजू जगताप, योगेश कुलवधे, बाळासाहेब ढेरिंगे, राहुल रामराजे, बबन सैद, अण्णा सोनवणे आदी पदाधिकारी तसेच कामगार उपस्थित होते.

The post नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसला मिळाले 70 लाख पासपोर्ट छपाईचे काम appeared first on पुढारी.