नाशिकरोडच्या 33 लाखांच्या दोन घरफोड्यांची उकल

घरफोडीची उकल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणार्‍या दोन संशयितांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पकडले आहे. चोरट्यांकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, घरफोडीतील 21 लाखांचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 32 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रोहन संजय भोळे (35, रा. नाशिकरोड) व ऋषिकेश मधुकर काळे (26, रा. गंधर्वनगरी, नाशिकरोड) अशी पकडलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. जयभवानी रोडवरील रहिवासी संजय ईश्वरलाल बोरा यांच्या घरात 10 जुलैला भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी 17 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केले होते. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकातील अंमलदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे व गुन्ह्यात चेारट्यांनी वापरलेली कार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी कारची माहिती घेत दोघा संशयितांना सापळा रचून दत्तमंदिर रोड परिसरात पकडले. त्यांच्याकडील चौकशीतून त्यांनी बोरा यांच्या घरात घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांनी घरफोडीतील मुद्देमालही पोलिसांना दिला.

दरम्यान, दोघांनी 8 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जयभवानी रोडवरील रहिवासी सोहनलाल रामानंद शर्मा यांच्या घरातही घरफोडी करून 13 लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांकडून 21 लाख 68 हजार 500 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, नऊ लाख 50 हजार रुपयांच्या दोन कार व एक दुचाकी वाहन आणि एक लाख 20 हजार रुपयांचे दोन मोबाइल जप्त केले आहेत. दोघा संशयितांना न्यायालयाने मंगळवार(दि.19)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयितांनी घरफोडी करताना वापरलेली रिट्स कार सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी त्यानुसार शहरातील त्या रंगाच्या रिट्स कारची माहिती घेतली. कारवरील फास्टॅग नावाचे स्टिकर यावरून कारचा शोध घेतला. त्याचप्रमाणे गेट अ‍ॅनालिसिस पद्धतीद्वारे सीसीटीव्हीत कैद झालेल्या व प्रत्यक्षात दोघांच्या चालण्याच्या ढब जुळल्याने दोघांविरोधात ठोस पुरावा मिळाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

शेअर बाजारात नुकसानीने गुन्हेगारीकडे वळले
दोघांनीही परिसराची रेकी करून दोन घरफोड्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याचप्रमाणे संशयित रोहन भोळे हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असताना त्यास आर्थिक नुकसान झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकरोडच्या 33 लाखांच्या दोन घरफोड्यांची उकल appeared first on पुढारी.