
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमणविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिकरोडसह शहराच्या मध्यवर्ती भागात आठवडाभरात चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
शुक्रवारी (दि.१२) नाशिकरोड येथे शिवाजी चौक, बिटको पॉइंट, वॉस्को चौक ते गायकवाड मळ्यापर्यंत रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ५ टेबल, १५ क्रेटस, सहा स्टॅण्ड बोर्ड, पाच वजनाचे काटे, चार छत्र्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच पश्चिम विभागातील दहीपूल, सीबीएस, शालिमार परिसरात कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान १५ लोखंडी, लाकडी स्टॅण्ड, १८ प्लास्टिकचे पुतळे, कपड्यांचे १७ नग जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य अतिक्रमण विभागाच्या आडगाव येथील गोदामामध्ये जमा करण्यात आले.
आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाच्या डहाळे यांनी सहा विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोहीम प्रभावीपणे राबविण्याची सूचना केली आहे. सुमारे एक महिनाभर व्यापक स्वरूपात विशेष संयुक्त मोहीम सुरू रहाणार आहे. स्वत:हून अनधिकृत बांधकामे, पत्र्याचे शेड, टपऱ्या अशा प्रकारचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे. अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल आणि कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डहाळे यांनी दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त मदन हरिश्चंद्र, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर, पंचवटीचे नरेंद्र शिंदे, पूर्व विभागाचे राजाराम जाधव, नवीन नाशिक व सातपूर विभागाचे डॉ. मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सहाही विभागांतील अतिक्रमण पथक आणि वाहनांचा सहभाग आहे.
सात दिवसांतील विशेष मोहीम.
५ मे – शालिमारला अनधिकृत पत्र्यांची २४ दुकाने हटविली.
१० मे – हिरावाडी लिंक रोड येथे एक अनधिकृत बांधकाम शेड जमीनदोस्त, अमृतधाम येथील नऊ आणि आडगाव पोलिस स्टेशनजवळील दोन अशा एकूण ११ टपऱ्या जप्त, नीलगिरी बाग येथे रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई.
११ मे – मेनरोड, आर. के. धुमाळ पॉइंट, एमजी रोड, सीबीएस येथे कारवाई, २५१ नग कपडे, ४० क्रेटस, २७ प्रवासी बॅगा, १० प्लास्टिक डबे, १ चारचाकी गाडी जप्त.
१२ मे – नाशिकरोड आणि पश्चिम विभागात रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई.
हेही वाचा :
- Parineeti Chopra engagement : बहिणीच्या साखरपुड्याला प्रियांका चोप्रा आली भारतात
- Sachin Tendulkar : ‘बनावट जाहिराती’ विरोधात ‘सचिन’ची मुंबई सायबर सेलकडे तक्रार
- पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार ! सिंहगडावर दरडी कोसळण्याचा धोका कायम
The post नाशिकरोडला अतिक्रमण पथकाची धडक कारवाई appeared first on पुढारी.