नाशिकला कांदा भावाची स्थिती जैसे थे

कांदा भाव

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

बांगलादेश आणि श्रीलंकेत थांबलेली निर्यात, देशात इतरत्र झालेले बंपर उत्पादन यामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घसरण झाल्याने सोमवारी (दि. 27) 10 तास कांदा लिलाव ठप्प झाले होते. मंगळवारी (दि. 28) कांदा लिलाव सुरळीत झाले मात्र, दरात काहीच सुधारणा न झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी ३०० सरासरी ६७५, तर जास्तीत जास्त १,२०१ रुपये भाव मिळाला. कांदा उत्पादकांना दिलासा देण्याकरिता नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लासलगावमधून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कांदा खरेदी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. जगभरातील अनेक देशांत कांदाटंचाई आणि महागाईने तेथील जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. फिलिपिन्स, तुर्कस्तान, मोरोक्को, उझबेकिस्तान तसेच युरोपातील अनेक देशांमध्ये सध्या कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. तर दुसरीकडे आपल्याकडे दर गडगडल्याने कांदा बाजारात विकण्याऐवजी रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असताना, महाराष्ट्रात कांद्याचे दर चार वर्षांतील नीचांकी पातळीवर आहेत. गेली तीन वर्षे कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला होता. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये लासलगाव बाजारात ११ लाख ६२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्यावेळी कांद्याला सरासरी १,३९२ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. चालू महिन्यात आवक त्याच प्रमाणात असली, तरी दर मात्र ८०० रुपयांनी घसरले आहेत.

महाराष्ट्रातील विशेषत: नाशिकमधील कांद्याला श्रीलंका आणि बांगलादेश येथून अधिक मागणी आहे. मात्र, बांगलादेशाने स्थानिक कांद्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आयातीवर बंदी आणली आहे. देशांतर्गत उत्पादित कांदा संपुष्टात येईपर्यंत बांगलादेश भारतीय कांद्याला परवानगी देईल याची शक्यता नाही. दुसरीकडे, श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे तिथे कांदा पाठविण्यास स्थानिक व्यापारी तयार नाहीत.

दीड बिघे कांदा क्षेत्रासाठी 35 हजार रुपये खर्च करून बियाणे घेतले. कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत साधारण एक लाख रुपये खर्च झाला आणि आता प्रत्यक्ष कांदा विकण्याची वेळ आली, तर 50 हजार रुपयेसुद्धा होणार नाहीत. त्यामुळे आता आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा ? मुलांचा परीक्षा जवळ आल्या आहेत. नऊ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्याचे पैसे भरायचे कुठून हा प्रश्न आहे. 

– गणेश साळवे शेतकरी, गोंदेगाव

हेही वाचा :

The post नाशिकला कांदा भावाची स्थिती जैसे थे appeared first on पुढारी.