
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात एकीकडे दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने नाशिकवर वक्रदृष्टी केली आहे. जुलैचा अखेरचा टप्पा सुरू झाला असतानाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याला शनिवारी (दि.२२) येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
आठ दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाला पावसाने तडाखा दिला आहे. सलगच्या पावसामुळे या विभागांमधील नद्या-नाले दुथडी वाहत असून, तेथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. एकीकडे संततधार असताना नाशिक जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. नाशिक शहर व परिसरात शुक्रवारी (दि.२१) काही हलक्या सरीवगळता पावसाने दडी मारली. त्यामुळे शहरवासीयांची निराशा झाली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातही आशादायक चित्र पाहायला मिळत नाही.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या चार तालुक्यांत अन्य तालुक्यांच्या तुलनेत काहीसा चांगला पाऊस झाला आहे. मात्र, उर्वरित तालुक्यातील जनतेला अद्यापही दमदार पर्जन्याची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ९३४ मिमी आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत २३५ मिमी पर्जन्याची नोंद झाली असून, वार्षिक पर्जन्यमानाच्या केवळ २६ टक्के इतके हे प्रमाण आहे.
हेही वाचा :
- केंद्र सरकारच्या स्वच्छता पोर्टलवर गोंडेगावची निवड, नाशिक जिल्ह्यातून तीन गावांची निवड
- नाशिक : दहा दिवसांत सव्वातीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, शहर वाहतूक शाखेची मोहीम
- ‘द्रुतगती’वर अपघात घटले ; गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी
The post नाशिकवर पावसाची वक्रदृष्टी, जिल्हावासीय चिंतातुर appeared first on पुढारी.