नाशिकसाठी वाढीव लसींचा साठा द्या! महापौर कुलकर्णी यांची केंद्र, राज्याकडे मागणी 

नाशिक : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ‘कोरोनामुक्त नाशिक’साठी वाढीव लससाठा द्यावा, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे. नाशिककरांनी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचे पालन करून कोरोनामुक्त नाशिकच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. 

नाशिक शहरात कोरोना रुग्णांची आकडेवारी एक लाख दहा हजारांच्या पार गेली असून, शहराची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे एकीकडे महापालिका आयुक्त रस्त्यावर उतरून नाशिककरांना मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन करीत असताना, महापौर कुलकर्णीही खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले आहेत. महापौर कुलकर्णी यांनी नाशिककरांमध्ये कोरोनासंदर्भात जनजागृती सुरू केली असून, अधिकाधिक प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. लसीकरण मोहिमेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महापालिकेला साठा उपलब्ध होत आहे. मात्र, संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लसींचा साठा कमी पडत असल्याने वाढीव साठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. शहरात रोज १५ ते २० हजार लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने लसींचा साठा शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

कोरोनामुक्त नाशिकच्या लढ्यात नाशिककरांनी सहभागी होताना मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन केल्यास आजारावर नियंत्रण शक्य होईल. केंद्र व राज्य शासनाकडे वाढीव लसींसाठी पत्रव्यवहार केला आहे. 
-सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड