नाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध; मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा 

नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन परिणामकारक ठरत असल्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यासाठी मायलन कंपनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. बुधवारी (ता. १४) नाशिकरांसाठी सात हजार रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध होणार आहे. बंगलोरहून एका विशेष विमानाने हा इंजेक्शनचा साठा मुंबईमार्गे नाशिकला येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. 

नाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध
रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असून, मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठासाठा अल्प असल्याने जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिव्हिरचा तुटवडा भासू लागला आहे. या मुळे कोरोनाबाधितांच्या अडचणीसह रेमडेसिव्हिरचा काळाबाजार होत असल्याच्या घटना गेल्या आठवड्यात उघडकीस आल्या आहेत. सर्वसामान्य रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होणे अश्यक्य होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकृत पुरवठाधारकांना रेमडेसिव्हिर उत्पादक कंपनीकडून इंजेक्शन आयात होत नसल्यामुळे एजन्सीधारकही हतबल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी काही इंजेक्शन पुरवठाधारकांच्या शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेत मायलन कंपनीकडून पुरेसा इंजेक्शन साठा उपलब्ध व्हावा, यासाठी साकडे घातले होते. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा 
दरम्यान, मायलन कंपनीने दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा जिल्हावासीयांसाठी उपलब्ध करून द्यावा, यासाठी गेल्या चार दिवसांत खासदार गोडसे यांनी मायलन कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. सोमवारी देखील खासदार गोडसे यांनी कंपनीचे नरेश हसीजा यांच्याशी संपर्क साधत तातडीने नाशिक जिल्हावासीयांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची गळ घातली होती. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

खासदार गोडसे यांचे प्रयत्न
मायलन कंपनी प्रशासनाने मंगळवारी (ता. १३) पाच हजार रेमडेसिव्हिर साठा पाठवित असल्याची माहिती खासदार गोडसे यांना दिली. नाशिक शहरासह जिल्ह्याची वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता पाच हजार इंजेक्शनच्या साठ्यावर खासदार गोडसे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अजून अधिकचा इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. बुधवारी सकाळी हा सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा बंगलोर येथून एका विशेष विमानाने मुंबईत येणार असून, त्यानंतर बायरोड हा साठा नाशिक शहरातील अधिकृत वितरकांपर्यंत पोचणार आहे. यात गेट वेल- दोन हजार, लाइफलाइन फार्मा- दीड हजार, दि विजय- दीड हजार, पी.एस. फार्मा- एक हजार असा रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा शहरातील अधिकृत एजन्सींना होणार आहे.