नाशिकहुन गोवा व बंगळुरसाठी विमानसेवा

विमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिक-गोवा विमानसेवा सुरू करण्याची मागणी नाशिककरांकडून होत होती. आता या मागणीला मूर्त स्वरूप येताना दिसत आहे. स्पाइसजेटकडून 25 सप्टेंबरपासून नाशिक – गोवा व बंगळुरू विमानसेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. हैदराबाद व नवी दिल्ली विमानसेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

नागरी उड्डाण संचालनालयाकडे परवानगी मागितली आहे. गेल्या 22 जुलैपासून नाशिक – हैदराबाद विमानसेवेला प्रारंभ झाला असून, या सेवेला प्रतिसादही चांगला मिळत आहे. येत्या 4 ऑगस्टपासून नाशिक – नवी दिल्ली विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानंतर आता स्पाइसजेटकडून नाशिकला बंगळुरू व गोव्याची कनेक्टिव्हिटी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कंपनीने नागरी उड्डाण संचालनालयाकडे बंगळुरू – नाशिक – गोवा व गोवा – नाशिक – बंगळुरू या दोन सेवांसाठी परवानगी मागितली आहे. त्यानुसार येत्या 25 सप्टेंबरपासून बंगळुरू येथून निघालेले विमान दुपारी 2.35 वाजता नाशिकला पोहोचणार असून, ते दुपारी 2.55 वाजता गोव्याच्या दिशेने उड्डाण करणार आहे, तर गोव्याकडून निघालेले विमान सायंकाळी 6.35 वाजता नाशिकला पोहोचणार असून, ते 6.55 वाजता बंगळुरूकडे प्रयाण करणार आहे. या दोन्ही सेवा दररोज उपलब्ध राहणार आहेत. नागरी उड्डाण संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या दोन्ही सेवांचा मार्ग मोकळा होणार आहे.

सेवांवर परिणाम नाही
नागरी उड्डाण संचालनालयाने स्पाइसजेटच्या 50 टक्के उड्डाणांवर निर्बंध आणले आहेत. पुढील आठ आठवड्यांसाठी हे निर्बंध राहणार आहेत. नाशिकमध्ये स्पाइसजेटची हैदराबाद सेवा सुरू असून, येत्या 4 ऑगस्टपासून नवी दिल्लीसाठी सेवा सुरू होणार आहे. मात्र, या निर्बंधांचा परिणाम या दोन्ही सेवांवर होणार नसून, त्या सुरळीत राहणार असल्याचे कळते.

हेही वाचा :

The post नाशिकहुन गोवा व बंगळुरसाठी विमानसेवा appeared first on पुढारी.