Site icon

नाशिकहुन राजस्थानकडे उंट अखेर रवाना, ‘इतक्या’ दिवसांनी पोहोचणार

नाशिक (सिडको) पुढारी वृत्तसेवा

पांजरपोळ येथे आश्रयासाठी ठेवलेल्या 111 पैकी बारा उंटांचा मृत्यू झाला असून केवळ 99 उंट या ठिकाणी उरले होते. काल राजस्थानहुन या उंटाना घेऊन जाण्यासाठी रायका नाशिकमध्ये दाखल झाला होता. अखेरीस आज शुक्रवार (दि. 19) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हे उट पांझरपोळ येथून राजस्थानच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान एक उंट प्रवेशद्वारावरच जखमी झाल्याने त्यास पांझरपोळ येथेच ठेवण्यात आले असून उर्वरित सर्व 98 उंट हे राजस्थानकडे रवाना करण्यात आले आहेत. रोज वीस ते पंचवीस किलोमीटर प्रवास करुन तब्बल पंचवीस दिवसानंतर हे उंट राजस्थानला पोहचणार आहेत.

नाशिक येथे (दि. 4) मे रोजी तस्करीसाठी जात असलेल्या उंटांची माहिती प्राणिमित्रांना मिळाली होती. 111 उंटांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन उंटांच्या संगोपनाची जबाबदारी पांजरपोळ संस्थेला दिली होती. मात्र, हजारो किलोमीटर लांबवरून पायपीट करून आल्याने व वातावरणातील बदल यामुळे अत्यावस्थ झाल्याने पैकी तब्बल 12 उंटांचा मृत्यू पांजरपोळ येथे झाला. त्यांच्या मृत्यूची संख्या लक्षात घेत प्राणी मित्रांसह पांजरपोळ संस्थेने हे उंट राजस्थानला पुन्हा घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र व्यवहार केला होता.

यानंतर राजस्थान येथील एका संस्थेने या उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. त्यानुसार राजस्थान येथून उंटांना सांभाळणारे सात रायका गुरुवारी पांजरपोळ येथे दाखल झाले होते. आज शुक्रवार (दि.19) सकाळी पशु संवर्धन विभागचे अधिकारी गिरीश पाटील, डॉ. वैशाली थोरात, डॉ. साखरे यांनी पांजरपोळ येथे भेट दिली. या नंतर व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांना पत्र मिळाले. जिल्हाधिकारी यांच्या कडील पत्र रायकांना दिल्या नंतर उंट राजस्थानकडे रवाना झाले. रायका हे उंट वणी मार्गे घेऊन जाणार आहे. यात दररोज वीस ते पंचवीस किलो मीटर इतका प्रवास उंट करणार आहे. पंचवीस दिवसात राजस्थान येथे उंट पोहोचणार असल्याची माहिती रायका यांनी दिली.

दरम्यान पांझरपोळ येथे या उंटाच्या संगोपनासाठी रोज 40 ते 50 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांनी दिली.

हेही वाचा :

The post नाशिकहुन राजस्थानकडे उंट अखेर रवाना, 'इतक्या' दिवसांनी पोहोचणार appeared first on पुढारी.

Exit mobile version