नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या ९२ अंगणवाड्यांबरोबरच शिक्षण मंडळाच्या १०० शाळांमधील ९४९ पैकी तब्बल ५२२ इतक्या वर्गखोल्या नादुरुस्त असल्याने येत्या तीन वर्षांत या वर्गखाेल्या दुरुस्तीचे उद्दिष्ट मनपा प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार समाजकल्याण तसेच शिक्षण मंडळाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

शिक्षणाचा पाया म्हणून अंगणवाडी, बालवाडीकडे पाहिले जाते. बालपणापासूनच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शासनाने अंगणवाड्यांचा पाया रचला आहे. त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातही अंगणवाड्या, बालवाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु, या अंगणवाड्यांची जागा खासगी शिक्षण संस्थांच्या केजी, पीजी आणि माँटेसरीने घेतल्याने अंगणवाड्या दुर्लक्षित होत आहेत. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांचेही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य व गोरगरीब कुटुंबांतील मुलांना अंगणवाड्याही दुरापास्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ४१९ अंगणवाड्यांपैकी जवळपास ९२ अंगणवाड्यांना इमारतीच नसल्याने त्यातील चिमुकल्यांना उघड्यावरच बसून शिकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत असावी, या अनुषंगाने शाळाखोल्या बांधण्यात येणार आहेत. अंगणवाड्यांबरोबरच मनपा शिक्षण मंडळाच्या १०० शाळा इमारतींमध्ये असलेल्या ९४९ वर्गखोल्यांपैकी जवळपास ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे ५२२ वर्ग खोल्या नादुरुस्त आहेत. त्यातील १९५ शाळा धोकादायक स्थितीत असून, त्याखालोखाल ३२७ शाळांच्या वर्गखोल्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.

मतदान केंद्र म्हणूनही वापर : अंगणवाड्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या वर्गखोल्यांचा वापर भविष्यात मतदान केंद्र म्हणूनही करता येऊ शकतो. त्याशिवाय महिलांसाठीचे आरोग्य शिबिर तसेच लहान मुलांच्या लसीकरणाकरताही या खोल्यांचा वापर केला जाऊ शकताे, त्यानुसारच खोल्यांचे बांधकाम करण्यासह त्या ठिकाणी वीज, पाणी व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याची संकल्पना असल्याचे समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त डाॅ. दिलीप मेनकर यांनी सांगितले.

अंगणवाड्या व शाळाखाेल्यांचे बांधकाम करण्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी महिला बालकल्याणबरोबरच इतरही विभागांचा निधी वर्ग करण्यात येईल. येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने शाळाखोल्यांचे बांधकाम हाती घेतले जाणार असून, तत्काळ प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, मनपा

हेही वाचा:

The post नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त appeared first on पुढारी.