नाशिक : अंबड-सातपूर एमआयडीसी हिरवीगार करणार, वृक्षलागवडीसाठी आयमाचा पुढाकार

अंबड

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड व सातपूर औद्योगिक परिसर हरित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सर्व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावून कायमस्वरूपी जतन करण्याचा संकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने केला आहे. याबाबत सर्व नियोजनही करण्यात आल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.

अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अंबड औद्योगिक वसाहतीतील आयमाच्या रिक्रिएशन सेंटर, आयमा हाउस, सेंट्रल वेअर हाउस पांचाळ इंजिनीअर्स येथील व ट्रम्फ इंजिनीअरिंग परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर के. आर. बूब या सभागृहात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, आयामाचे सरचिटणीस ललित बूब, कार्यकारी अभियंता जे. सी. बोरसे, आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सचिव योगिता आहेर, वृक्षलागवड समिती चेअरमन दिलीप वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी वृक्षलागवाडीचे महत्त्व सांगितले. कोरोनामुळे झाडांचे महत्त्व पटले असून, अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत दरवर्षी वृक्षलागवड करण्यासाठी आयमा सक्रिय पुढाकार घेणार असल्याचे पांचाळ यांनी नमूद केले. ”ग्रीन अंबड – क्लीन अंबड” ची माहितीही त्यांनी दिली. ललित बूब यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी अध्यक्ष जे. आर. वाघ, ज्ञानेश्वर गोपाळे, सचिव गोविंद झा, खजिनदार राजेंद्र कोठावदे, हर्षद बेळे, संजय महाजन, विनीत पोळ आदी उद्योजक उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : अंबड-सातपूर एमआयडीसी हिरवीगार करणार, वृक्षलागवडीसाठी आयमाचा पुढाकार appeared first on पुढारी.