Site icon

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन नियमित व तीन विशेष अशा एकूण सहा फेर्‍या पार पडल्या आहेत. अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत कायम असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून सोमवार (दि. 26) पासून दैनंदिन विशेष फेरी (डेली मेरिट राउंड-डीएमआर) राबविण्यात येणार आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि. 30) प्रवेशाची मुदत देण्यात आली आहे.

नाशिक शहरातील विविध 63 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या 26 हजार 480 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. दुसर्‍या विशेष फेरीपासून पुरवणी परीक्षा उत्तीर्ण आणि एटीकेटी सवलतप्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आलेली आहे. तिसर्‍या विशेष फेरीनंतर 18 हजार 426 विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर 8 हजार 54 जागा अद्यापही रिक्त आहेत. या रिक्त जागा दैनंदिन गुणवत्ता फेरीतून भरण्याचे नियोजन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. त्याबाबतचे अधिकृत वेळापत्रक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

अकरावी प्रवेशासाठी यापूर्वी घेण्यात आलेल्या फेर्‍यांमध्ये अलॉटमेंट देताना विद्यार्थ्यांना पसंतीनुसार एकच विद्यालय दिले जात होते. त्यामुळे प्रत्येक फेरीमध्ये काही विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार अलॉटमेंट मिळत नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासह त्यांनी पसंती दर्शविलेल्या विद्यालयात प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील स्थान समजावे, यासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी दैनिक गुणवत्तेवर अधारित असणार आहे. निवडलेल्या आणि प्रतीक्षाधीन विद्यार्थ्यांची यादी दररोज सकाळी दहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

दरम्यान, या फेरीअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. विद्यालयांसाठी 6 पर्यंत अतिरिक्त वेळ असणार आहे. तर सायंकाळी 7 पासून पुढील दिवसाच्या फेरीसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अर्जामध्ये किमान एक आणि कमाल 10 विद्यालयांची नोंदणी करता येणार आहे.

अशी असणार फेरी
दैनंदिन गुणवत्ता फेरी ही दररोज नवीन असणार, विद्यार्थ्यांना दररोज अर्ज भरावा लागणार, एकापेक्षा जास्त विद्यालयात प्रवेशाच्या संधीतून एकाची निवड करता येणार, दररोज पसंती व सुधारित गुणवत्ता यादी-हे या फेरीचे वैशिष्ट्य, रिक्त जागांचा तपशील वेळोवेळी प्रसिद्ध होणार, 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश पूर्ण करण्याचे लक्ष्य.

हेही वाचा :

The post नाशिक : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी appeared first on पुढारी.

Exit mobile version