नाशिक : अक्षरबाग फुलविणारे कुसुमाग्रज प्रतिष्ठान

कुसुमाग्रज प्रतिष्ठान,www.pudhari.news

नाशिक :

कुसुमाग्रज प्रतिष्ठान ही संस्था आदरणीय कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणेने सन 1990 मध्ये स्थापन केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्काराने व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. कुसुमाग्रजांच्या पश्चात त्यांचे  निवासस्थान, त्यांची स्मृती म्हणून जपण्यात आली असून, याच वास्तूत सुसज्ज असे वाचनालय चालवले जाते. टिळकवाडी आणि त्र्यंबक रोड परिसरातील वाचकांना या वाचनालयातून वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते. या वाचनालयात सुमारे 30 हजार 800 पुस्तके असून सभासद संख्या 2900 आहे. नाशिकमध्ये अत्यंत सुंदर असे कुसुमाग्रज स्मारकही आज उभे आहे.  स्मारकाच्या आवारात सुसज्ज असे लहान-मोठे नऊ दालने असून, या दालनांना कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतींची नावे दिली आहेत. येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल असते. याच आवारात वाचकांसाठी स्मारकाचे वाचनालय (अक्षरबाग दालन) असून याचा लाभ हजारो वाचक घेत असतात. या वाचनालयात 19 हजार पुस्तके असून सभासद संख्या 4500 आहे. महाविद्यालयीन तसेच विविध विद्यार्थ्यांसाठी नाममात्र दरात अभ्यासिकेची (प्रवासी पक्षी/श्रावण दालन) सोय उपलब्ध करून दिली आहे. या अभ्यासिकेचा विविध वर्गांतील सुमारे 200 ते 250 विद्यार्थी लाभ घेत आहेत. या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने यश मिळवत असून, अनेक विद्यार्थी शासकीय अधिकारी झाले आहेत. त्याचबरोबर शास्त्रीय संगीत, योग वर्ग तसेच कथ्थक वर्ग नियमित घेतले जातात. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पुढील पिढीस कुसुमाग्रजांबद्धल माहिती व्हावी, यासाठी त्यांचे जीवनदर्शन दालन (जीवनलहरी दालन) केलेले असून या दालनात तात्यासाहेबांचे विविध छायाचित्र आणि कविता प्रदर्शित केल्या आहे. तसेच तात्यासाहेबांच्या जीवनावर आधारित तयार केलेला गोदाकाठचा महाकवी हा माहितीपट दाखवला जातो. या दालनास बाहेर गावातून आलेले पर्यटक आवर्जून भेट देतात. विविध चित्रकार आणि शिल्पकार यांना आपल्या कलाकृतीच्या प्रदर्शनासाठी कला दालन खास तयार केले आहे. नाशिककर तसेच बाहेरील कलाकार प्रदर्शनाचे आयोजन करतात या प्रदर्शनांना नाशिककरांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असतो.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षा आड मराठी साहित्यात उल्लेखनीय कार्य करणार्‍या साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्काराच्या धर्तीवर जनस्थान पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये रोख सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. या पुरस्काराची सुरुवात तात्यासाहेबांनी स्वतःच केली आहे. म्हणून या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. त्याच प्रमाणे एक वर्षा आड विविध सहा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीस गोदावरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यात 1) लोकसेवा 2) ज्ञान/विज्ञान 3) चित्रपट/नाट्य 4) संगीत/नृत्य 5) क्रीडा/साहस 6) चित्र/शिल्प या सहा क्षेत्रांचा समावेश असतो. रुपये एकवीस हजार रोख सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.

वाचन साहित्याचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा यासाठी कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेली ग्रंथ तुमच्या दारी योजना राबविली जाते. या योजनेत वाचकांना आपल्या निवासाजवळ विनासायास विनामोबदला वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये ग्रंथ पेटीच्या स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून दिली जातात आणि ठराविक कालावधीने या पेट्या बदलवून दिल्या जातात. या योजनेत 100 पुस्तकांची ग्रंथपेटी तसेच 25 पुस्तकांची मराठी, इंग्रजी तसेच तरुणांसाठी व बालवाचकांसाठी ग्रंथ पेट्या असून भारतातील प्रमुख शहरे तसेच भारताबाहेर अनेक देशात योजना सुरू असून, या योजनेत 2000 पेक्षा जास्त ग्रंथ पेट्यांमधून 2 कोटी 50 लाख रुपयांच्या साहित्याचा समावेश आहे. या योजनेस अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी साहित्य अधिकाधिक वाचकांनी वाचावे, अधिकाधिक लोकांना वाचनाची सवय लागावी या हेतूने साहित्य भूषण ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये मराठीतील दर्जेदार पुस्तकांचा अभ्यासक्रम तयार केला असून, 100 मार्कांचा 1 याप्रमाणे 6 पेपर घेतले जातात. पेपर घरीच लिहावयाचे असल्याने व परीक्षेसाठी शिक्षणाची अथवा वयाची अट नसल्याने विविध क्षेत्रांतील वाचक या परीक्षेस बसतात. आजपर्यंत अनेक वाचकांनी ही पदवी मिळवलेली आहे. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरूनही या परीक्षेस प्रवेश घेतले जातात.

कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती मराठी भाषा व मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी सर्जनशील लेखन, अनुवाद, संशोधन, सर्वेक्षण अथवा संकलनाच्या कृतिशील उपक्रमासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी एक लाख रुपये मूल्याची कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती दिली जाते. सन 2014/2015 पासून ही अभ्यासवृत्ती सुरू असून, या अभ्यास वृत्तीमुळे अनेक नवोदित लेखक आणि साहित्यिकांना आपापले साहित्य निर्मितीस मोलाची मदत झाली आहे. नाशिककर रसिक आणि साहित्यिकांसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणजे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे

रामदास जगताप- 

व्यवस्थापक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, 

हेही वाचा :

The post नाशिक : अक्षरबाग फुलविणारे कुसुमाग्रज प्रतिष्ठान appeared first on पुढारी.