नाशिक : अखेरच्या श्रावण सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी (फोटो)

श्रावण सोमवार नाशिक

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त गोदाघाटावरील श्री शिवमंदिरांमध्ये दर्शन, अभिषेक व महाप्रसादासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.

पंचवटीतील श्री कपालेश्वरासह बाणेश्वर, नारोशंकर, नीळकंठेश्वर, टाळकुटेश्वर, शर्वायेश्वर, सिद्धेश्वर आदी शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
मंदिरात पहाटे काकडा आरती झाल्यानंतर आरती व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
श्रावण महिना सुरू झाल्यापासून गोदाघाटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला आहे. नाशिकसह परजिल्ह्यातूनही भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.

त्यात नंदी नसलेल्या एकमेव कपालेश्वर मंदिराची जगभरात ख्याती असल्याने प्रत्येक श्रावणी सोमवारी या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविक दाखल होत असतात.

त्यासोबतच गोदाघाटावरील बाणेश्वर, निळकंठेश्वर, टाळकुटेश्वर या मंदिरांतही भाविक हजेरी लावतात. तसेच, रामवाडी पुलाजवळील सिद्धेश्वर, कोठारवाठीतील बाणेश्वर, आडगाव नाक्यावरील मनकामेश्वर, तपोवनातील शर्वायेश्वर या मंदिरांनाही विशेष महत्व आहे.

(सर्व छायाचित्रे- रुद्र फोटो)

त्यामुळे अखेरच्या सोमवारी या मंदिरांत दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. अखेरचा सोमवार असल्याने अनेक भाविकांनी सत्यनारायण पूजनही केले. यानिमित्त भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.

The post नाशिक : अखेरच्या श्रावण सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी (फोटो) appeared first on पुढारी.