नाशिक : अखेर जिल्हा झाला टँकरमुक्त ; प्रशासनाकडून 34 टँकर बंद

पिण्याचे पाणी टॅंकर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू असून, नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. धरणांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.12) सात तालुक्यांतील 34 टँकर बंद केले. त्यामुळे जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबलेल्या पावसाने सर्वत्र चिंतेचे ढग तयार झाले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात 40 गावे आणि वाड्यांमधील ग्रामस्थांना 34 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली.

मात्र, गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकला असून, सर्वदूर संततधार बरसत आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी वाहत आहे. गावोगावी विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणेही 65 टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. भूगर्भातील पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने आढावा घेत जिल्ह्यात टँकर बंद केले आहेत.

यंदाच्या उन्हाळ्यात जिल्हावासीयांना तीव्र उकाड्याला सामोरे जावे लागले. कधी नव्हे ती पार्‍याने 41 अंशांपलीकडे झेप घेतली. त्यामुळे तीव्र झळा बसत होत्या. अशावेळी ग्रामीण भागातील जनतेला पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले होेते. तब्बल 84 टँकरच्या माध्यमातून 150 हून अधिक गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यातही येवल्यात सर्वाधिक टँकर सुरू होते.

दरम्यान, जूनच्या मध्यात काही तालुक्यांत झालेल्या चांगल्या पावसाने 50 टँकर बंद करण्यात आले. पण, काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने प्रशासनाला जूनअखेर 34 टँकरला मुदतवाढ द्यावी लागली होती. परंतु, पावसाने सध्या सर्वत्र झोडपून काढल्याने अखेरच्या टप्प्यात 34 टँकर प्रशासनाने बंद केले. त्यामुळे उशिराने का होईना जिल्हा अखेर टँकरमुक्त झाला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अखेर जिल्हा झाला टँकरमुक्त ; प्रशासनाकडून 34 टँकर बंद appeared first on पुढारी.