नाशिक : अज्ञात ट्रक्टरच्या धडकेत कांदा व्यापारी ठार

नाशिक

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : चांदवड–मनमाड रस्त्यावरील हॉटेल सहयाद्रीच्या समोर अज्ञात ट्रक्टर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील कांदा व्यापारी राजाराम बाबुराव नवले (४८, डावखरनगर) यांच्या डोक्याला गंभीर मार लागून उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत अनिल भास्कर पेंढारी (३९, हरनूल) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात ट्रक्टर चालकाविरोधात चांदवड ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा व्यापारी राजाराम नवले यांचे शहरातील चांदवड – मनमाड रस्त्यालगत असलेल्या कांद्याच्या खळ्यावर शनिवार (दि.४) रोजी सायंकाळी गेले होते. खळ्यावरील काम आटोपून नवले हे रात्री ८.३० वाजेच्या सुमारास खळ्यावरून डावखर नगर येथील घरी दुचाकीने चालले होते. त्यावेळी सहयाद्री हॉटेल समोरील रस्त्यावर उभा असलेला अज्ञात ट्रक्टर अचानक रस्त्यावर चालकाने घेतल्याने ट्रक्टरची दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात नवले यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले.

मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे हलविण्यात आले. अपघातात रक्तश्राव जास्त झाल्याने रविवार (दि.५) रोजी उपचार सुरु असताना नवले यांचा दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस हवालदार मन्साराम बागुल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

हेही वाचंलत का?

The post नाशिक : अज्ञात ट्रक्टरच्या धडकेत कांदा व्यापारी ठार appeared first on पुढारी.