
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- त्र्यंबक रोडवरील मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे उभारण्यात येणारे २५० कोटींचे वादग्रस्त उड्डाणपूल अखेर रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. या संदर्भातील प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करून या दोन्ही पुलांची प्रशासकीय मान्यता रद्द केली जाणार आहे.
२०२१ पासून या दोन्ही पुलांच्या उभारणीवरून वाद सुरू आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी या पुलांच्या उभारणीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. त्यावरून सत्तारूढ भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने राजकीय संघर्ष उभा राहिला होता. मात्र, नंतर भाजपनेच या पुलांच्या उभारणीच्या प्रस्तावाला महासभेत प्रशासकीय मंजुरी दिल्याने पुलांच्या उभारणीतील अर्थकारण चर्चेत आले होते. दरम्यानच्या काळात उड्डाणपुलापूर्वी वाहतूक सर्वेक्षण नसणे, विशिष्ट ठेकेदारांना समोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविणे, सिमेंटच्या दर्जाची प्रतवारी वाढवण्याच्या नावाखाली ४४ कोटी रुपये रकमेत वाढ करणे, स्टार रेट लावून दर वाढवणे आदी प्रकार समोर आल्याने दोन्ही उड्डाणपुलांचे काम वादात सापडले. इतकेच नव्हे तर, त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलासाठी उंटवाडी परिसरातील शंभर वर्षे जुन्या पुरातन वडाच्या झाडावर कुऱ्हाड चालवण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्यानंतर पर्यावरणप्रेमी एकवटले होते. त्याची दखल घेत तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः पाहणी करून पुरातन वृक्षाला धक्का न लावता काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी मायको सर्कल येथील उड्डाणपूल रद्द केला, तर आयआयटी पवईने त्रिमूर्ती चौकातही तूर्त उड्डाणपुलाची गरज नसल्याचा अहवाल दिला होता. मात्र, या पुलाच्या उभारणीसाठी मक्तेदाराला कार्यारंभ आदेश दिला गेल्याने महापालिकेचे हात बांधले गेले होते. निर्धारित मुदतीत ठेकेदाराने काम न केल्याने अखेर या दोन्ही उड्डाणपुलांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यासाठी बांधकाम विभागामार्फत महासभेवर प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे वृत्त आहे.
श्वेतपत्रिका जाहीर करणार
उड्डाणपुलांची प्रशासकीय मान्यता रद्द करताना त्यामागची कारणमीमांसादेखील प्रशासनाला विशद करावी लागणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलांना मान्यता कधी दिली, कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ठेकेदाराला काम करू करण्यासाठी दिलेल्या पत्रांचा तपशील, ठेकेदाराकडून आलेली लेखी उत्तरे, तसेच अन्य आवश्यक मागणी या सर्वांचा तपशील महासभेच्या प्रस्तावासमवेत सादर केला जाणार असल्याने एकप्रकारे ही श्वेतपत्रिकाच असणार आहे.
त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी संबंधित मक्तेदारास कार्यारंभ आदेश दिल्यानंतर दोन वर्षे उलटली तरी काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे या पुलाचे काम रद्द करण्याचा प्रस्ताव असेल तर त्यासाठी महासभेची मान्यता घेतली जाईल.
– शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा
हेही वाचा :
- राजस्थानमध्ये काँग्रेसने दिले जातनिहाय सर्वेक्षणाचे आश्वासन, निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध
- India vs Australia T20 series : पुन्हा संघाबाहेर! ‘या’ इमोजीने चहलला काय सांगायचं आहे?
- अमेरिकन निवडणुकीतील भारतीय
The post नाशिक : अडीचशे कोटींचे वादग्रस्त उड्डाणपूल होणार रद्द appeared first on पुढारी.